बांगलादेश क्रिकेट टीमने श्रीलंकेचा धुव्वा उडवल्यानंतर मायदेशतही धमाका केला आहे. बांगलादेशने श्रीलंकेनंतर पाकिस्तानवर सलग दुसरा विजय मिळवत टी 20i मालिका नावावर केली आहे. बांगलादेशने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. बांगलादेशने ढाक्यातील शेरे बांगला स्टेडियममध्ये दुसऱ्या टी 20 सामन्यात 133 धावांचा यशस्वी बचाव केला. बांगलादेशने पाकिस्तानसमोर 134 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यामुळे पाकिस्तानला सामना जिंकून मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याची संधी होती. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांनी कमाल केली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 19.2 ओव्हरमध्ये 125 ऑलआऊट केलं आणि 8 धावांनी सामना आपल्या नावावर केला.
पाकिस्तानने टॉस जिंकून बांगलादेशला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी बांगलादेशला झटपट झटके दिले. त्यामुळे बांगलादेशची 4 बाद 28 अशी स्थिती झाली. मात्र जाकेर अली आणि मेहदी हसन या जोडीने केलेल्या खेळीमुळे बांगलादेशला सन्मानजनक आव्हान ठेवता आलं. बांगलादेशसाठी जाकेर अली याने सर्वाधिक धावा केल्या. जाकेरने 48 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 1 फोरसह 55 रन्स केल्या. तर मेहदी हसन याने 25 बॉलमध्ये 2 आणि 2 फोरसह 33 रन्स जोडल्या. तर परवेझ होसैन इमोन याने 13 धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडाही गाठता आला नाही.
पाकिस्तानला 134 धावांचं माफक आव्हान मिळाल्याने पहिल्या पराभवानंतर मालिकेत 1-1 ने बरोबरी करण्याची सुवर्णसंधी होती. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे फलंदाज ढेर झाले. पाकिस्तानची बांगलादेशपेक्षा वाईट सुरुवात झाली.
पाकिस्तानने 4 धावांवर पहिली विकेट गमावली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी एक एक करत पाकिस्तानला झटपट झटके दिले. त्यामुळे पाकिस्तानची 15 धावांवर 5 अशी भीषण स्थिती झाली. पाकिस्तानच्या पहिल्या 6 पैकी तिघांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर तिघे आले तसेच भोपळा न फोडताच माघारी परतले. पाकिस्तानला इथून काही कमबॅक करता आलं नाही.
त्यानंतर शेपटीच्या काही फलंदाजांनी झुंज देत पाकिस्तानच्या विजयाचा आशा कायम ठेवल्या. फहीम अश्रफ याच्या अर्धशतकी खेळीमुळे पाकिस्तान जिंकेल असं त्यांच्या चाहत्यांना आशा होती. मात्र बांगलादेशच्या गोलंदाजांनी पाकिस्तानला 8 धावांआधीच रोखलं. पाकिस्तानला विजय मिळवणं सोडा पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. पाकिस्तानचं अशाप्रकारे 19.2 ओव्हरमध्ये 125 धावांवर पॅकअप केलं.
पाकिस्तानसाठी फहीमने 32 बॉलमध्ये 4 फोर आणि तितक्याच सिक्सच्या मदतीने 51 धावा केल्या. तर इतर तिघांनी दुहेरी आकडा गाठला. तर बांगलादेशसाठी शोरिफूल इस्लाम याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मेहदी हसन आणि तंझीम हसन साकीब या जोडींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेत पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. तर मुस्तफिजूर रहमान आणि रिषाद हौसेन या जोडीने प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.