बांगलादेशची राजधानी असलेल्या ढाकामध्ये भीषण विमान दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ३२ लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक लोक जखमी झाले. बांगलादेशमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर देशाचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्यावर टीका केली जात आहे. सरकारकडून जुन्या चिनी विमानांचा वापर का केला जात आहे, असा प्रश्न नागरिकांकडून केला जात आहे. यामुळे सध्या बांगलादेशातील सरकारी प्रतिनिधींना विरोधाचा सामना करावा लागत आहे.
बांगलादेश लष्कराचे एक प्रशिक्षणार्थी जेट विमान माइलस्टोन स्कूलवर कोसळले होते. या दुर्घटनेत ३० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर मोहम्मद युनूस यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी देशवासियांना पैसे दान करण्याचे आवाहन केले होते. या पैशातून माइलस्टोन स्कूलवरील जेट क्रॅशमध्ये मृत आणि जखमी झालेल्या कुटुंबांना मदत केली जाईल, असे नमूद केले होते. मात्र युनूस यांच्या या पोस्टमुळे बांगलादेशात राजकीय गदारोळ उडाला. विमान दुर्घटनेनंतरच्या या पोस्टवर अनेक लोकांनी युनूस सरकारवर टीका केली. अपघातातील पीडितांना मदत करण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी नाही का? असा सवालही उपस्थित करण्यात आला.
हा वाद इतका वाढला की मोहम्मद युनूस यांना तात्काळ ती फेसबुक पोस्ट डिलीट करावी लागली. मोहम्मद युनूस यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लोकांना मुख्य सल्लागार मदत आणि कल्याण निधीमध्ये दान करण्याचे आवाहन केले होते. बांगलादेशी वृत्तपत्र द डेली स्टारच्या लेखानुसार, ही पोस्ट मुख्य सल्लागाराच्या अधिकृत पेजवरून २२ जुलै २०२५ रोजी दुपारी २.०० वाजल्यानंतर प्रकाशित करण्यात आली होती. मोहम्मद युनूस यांच्या वरिष्ठ सहायक प्रेस सचिव फयेज अहमद यांनीही प्रेस विंगच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये ही पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे ही पोस्ट अधिकृत खात्यातूनच केली गेली होती यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
मोहम्मद युनूस यांच्या या फेसबुक पोस्टवर अनेकांनी तीव्र विरोध केला. अनेक राजकीय पक्षांसह सामान्य जनतेने युनूस यांच्यावर हल्ला चढवला. या फेसबुक पोस्टवर एवढा गोंधळ उडाला की याबद्दल कारण न देता ते डिलीट करण्यात सांगण्यात आले. अमीन सोनी नावाच्या एका व्यक्तीने म्हटले की युनूस साहेबांना आता देश चालवण्यासाठी भीक मागावी लागत आहे. तर दुसऱ्या युजर्सने म्हटले की, मुख्य सल्लागाराच्या अधिकृत पेजवरून अशा पोस्टचा काय अर्थ आहे? सरकारकडे पीडितांना मदत करण्यासाठी संसाधने नाहीत का? हा जनतेचा अपमान आहे. तर एकाने गेल्या वर्षीच्या पूर निधीतील १२०० कोटी बांगलादेशी रुपयांचे काय झाले? तुम्ही पुन्हा तुमची योजना घेऊन आला आहात का? आपला बांगलादेश एक राष्ट्र आहे, एनजीओ नाही, अशी टीका केली आहे.