उन्हाळ्याची तीव्रता वाढते तसा लोकांचा कल थंड आणि हायड्रेटिंग पदार्थांकडे वाढतो. नारळपाणी हे त्यातलं सर्वात लोकप्रिय पेय. यामध्ये असते व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आणि पोटॅशियमसारखी अनेक पोषकतत्त्वं. मात्र, ‘सगळ्यांसाठी नारळपाणी चांगलंच असतं’ हा समज चुकीचा ठरू शकतो. काही विशिष्ट आरोग्यस्थिती असलेल्या लोकांसाठी नारळपाणी पिणं हानिकारक ठरू शकतं. चला तर जाणून घेऊया कोणत्या लोकांनी नारळपाणी टाळावं, आणि का… (coconut water who should avoid side effects in marathi)
1) किडनीविकार असलेले रुग्ण
किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये शरीरातील पोटॅशियम फिल्टर होण्याची क्षमता कमी होते. नारळपाण्यात नैसर्गिक पद्धतीने पोटॅशियमचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे हे पाणी पिल्यास हायपरक्लेमियाचा धोका वाढतो म्हणजेच हृदयाचे ठोके वाढणे, घबराट होणे आणि इतर गुंतागुंत होऊ शकते.
2) मधुमेही व्यक्ती
नारळपाण्यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये रक्तातील साखर वाढू शकते. विशेषतः अनियमित प्रमाणात घेतल्यास त्याचा त्रास होऊ शकतो.
3) वयस्कर नागरिक
वृद्ध वयोगटातील लोकांची शरीरक्रिया संथ असते आणि पाचनक्रिया देखील कमी प्रभावी असते. जास्त पोटॅशियममुळे त्यांच्या हृदयावर ताण येऊ शकतो. त्यामुळे नारळपाण्याचं प्रमाण मर्यादित ठेवणं महत्त्वाचं.
4) ऍलर्जी असलेले लोक
ज्यांना अन्नातील विशिष्ट पदार्थांमुळे ऍलर्जी होण्याचा अनुभव आहे, त्यांनी नारळपाणी पिण्यापूर्वी दक्षता घ्यावी. काही वेळा त्वचेवर पुरळ, खाज, सूज येणे अशा लक्षणांची शक्यता असते.
5) उच्च रक्तदाब असलेले रुग्ण
नारळपाणी हे नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सने भरलेलं असतं. पण काही वेळा, जेव्हा रक्तदाब नियंत्रणासाठी औषधे घेतली जातात, तेव्हा नारळपाण्यातील घटक औषधांच्या परिणामात हस्तक्षेप करू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच सेवन करावं.
नारळपाणी किती प्रमाणात पिणं योग्य?
साधारणतः एका व्यक्तीने दररोज अर्धा ते एक ग्लास नारळपाणी पिणं सुरक्षित मानलं जातं तेही उन्हात अधिक वेळ राहिल्यावर किंवा शरीरातून मोठ्या प्रमाणावर घाम गेला असेल, अशा वेळी. मात्र, वरीलपैकी कोणत्याही गटात तुम्ही मोडत असाल, तर हे प्रमाण अजूनच कमी असावं किंवा पूर्णपणे टाळावं.
नारळपाण्याचे आरोग्यदायी फायदे:
1) शरीर हायड्रेट ठेवते
2) पचनसंस्था सुधारते
3) वजन कमी करण्यास मदत करते
4) त्वचेला नैसर्गिक चमक मिळते
5) केस गळती कमी करते
7) शरीरातली विषारी द्रव्यं बाहेर काढण्यास मदत
8) ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते
नारळपाणी हे नैसर्गिक आरोग्यवर्धक पेय असलं तरी, प्रत्येकासाठी उपयुक्त असतंच असं नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा आजार असल्यास, नारळपाणी नियमितपणे पिण्याआधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.