कसोटी क्रिकेटमध्ये 20 विकेट घेण्याची क्षमता असेल तर सामने जिंकता येतात. गौतम गंभीर टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यापूर्वी त्याने अनेकदा ही बाब अधोरेखित केली. पण आता त्याला त्याचा विसर पडल्याचं दिसत आहे. कारण प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार शुबमन गिल या जोडीचे काही निर्णय भारतीय संघाला पराभवाच्या दरीत ढकलत आहेत. इतकंच काय तर आतापर्यंत झालेल्या सामन्यात भारताचं मोठं नुकसान झालं आहे. कारण चौथ्या कसोटी सामन्यात विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवला प्लेइंग 11 मध्ये घेतलं नाही. यावर माजी क्रिकेटपटू आर अश्विनने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. या माध्यमातून त्याने संघ व्यवस्थापनावर बोट ठेवलं आहे. आर अश्विनने सांगितलं की, ‘जर कोणी मला सांगितले असते की कुलदीप यादव पहिल्या 4 कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नाही, तर मला खूप धक्का बसला असता. दुर्दैवाने, आम्हाला फलंदाजी मजबूत करायची आहे आणि तीही फक्त 20-30 अतिरिक्त धावांसाठी.’
मँचेस्टर कसोटीत आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरच्या निवडीवरही आर अश्विनने बोट ठेवलं आहे. वॉशिंग्टन सुंदरला दुसऱ्या दिवशी एकही षटक देण्यात आले नाही. तसेच कुलदीप यादवसारखा स्ट्राइक गोलंदाज आहे पण त्याला अजून संधी मिळालेली नाही. याबाबत आर अश्विनने रोखठोक मत मांडलं.’जर तुम्हाला शार्दुल ठाकूरला इतकी गोलंदाजी करायला लावायची असेल तर तुम्ही कुलदीप यादवची निवड का करत नाही. ही गोष्ट माझ्या समजण्यापलीकडे आहे.’, असं आर अश्विन म्हणाला.
भारताकडे जसप्रीत बुमराह वगळला तर विकेट घेईल असा एकही स्ट्राईक गोलंदाज नाही. त्यामुळे त्याच्या खांद्यावर अतिरिक्त भार येत आहे. पहिल्या कसोटीतही तसंच झालं. भारताने खोऱ्याने धावा केल्या. पण त्याचा बचाव करण्यास गोलंदाज अकार्यक्षम ठरले. सिराजचा फॉर्म काही हवा तसा नाही. शार्दुल, कंबोज आणि कृष्णा यांच्या गोलंदाजीला तशी धार नाही. त्यामुळे संघात कुलदीप यादवची निवड व्हायला हवी होती. पण तो फलंदाजी करत नसल्याने गंभीर-शुबमन त्याला डावत असल्याचं दिसत आहे.