झिंबाब्वेत 14 जुलैपासून त्रिकोणी मालिकेचं आयोजन करण्यात आलंय. या त्रिकोणी मालिकेत यजमान झिंबाब्वेसह, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका आमनेसामने होते. या मालिकेतील साखळी फेरीतील सहावा आणि शेवटचा सामना हा 24 जुलैला खेळवण्यात आला. न्यूझीलंडने यजमान झिंबाब्वेचा धुव्वा उडवत विजयी चौकार लगावला. झिंबाब्वेची यासह या मालिकेतील विजयाची पाटी कोरीच राहिली. त्यानंतर आता या मालिकेतील अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे अंतिम सामन्यात कोणता संघ विजय मिळवून मालिकेवर नाव कोरतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. हा सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल? हे जाणून घेऊयात.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना शनिवारी 26 जुलैला खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवण्यात येणार आहे.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 4 वाजता टॉस होईल.
न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर फॅनकोड एपवर पाहायला मिळेल.
मिचेल सँटनर अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं नेतृत्व करणार आहे. तर रॅसी व्हॅन डर ड्यूसेन याच्याकडे दक्षिण आफ्रिकेची धुरा आहे. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. न्यूझीलंड या मालिकेत अंजिक्य आहे. न्यूझीलंडने खेळलेले चारही सामने जिंकले आहेत. उभयसंघात साखळी फेरीत 2 वेळा आमनासामना झाला. न्यूझीलंडने दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. त्यामुळे न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग तिसरा विजय मिळवून मालिका जिंकण्यासाठी सज्ज आहे. तर दुसऱ्या बाजूला दक्षिण आफ्रिका गेल्या 2 पराभवाची परतफेड करत पलटवार करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.