Bombay High Court: पासपोर्टमधील सासर, माहेरच्या नावासंदर्भात धोरण ठरवा; खंडपीठाचे शासनाला निर्देश, तफावतीमुळे कुटुंबाला त्रास
esakal July 26, 2025 01:45 PM

छत्रपती संभाजीनगर : तीन वर्षांच्या मुलीचा पासपोर्ट काढताना आईच्या लग्नापूर्वीच्या व नंतरच्या नावामुळे त्रास सहन करावा लागला. माहेर आणि सासरच्या नावात तफावत असल्याने लहान मुलीचा पासपोर्ट नाकारण्यात आल्याने मुलांच्या जन्म प्रमाणपत्रावर आईचे सासर आणि माहेरच्या नावाचा उल्लेख घेण्यासंबंधीचा धोरणात्मक निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. मनीष पितळे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी राज्य शासनाला दिले.

श्रद्धा अजित पाटील यांचा विवाह सागर मडगी यांच्यासोबत झाला. त्यांना ईशानी ही तीन वर्षांची मुलगी आहे. श्रद्धा अजित पाटील या पदवीप्राप्त अभियंता असून त्यांच्या शैक्षणिक व इतर कागदपत्रांवर माहेरचे नाव आहे. त्यांचे आधार कार्डदेखील माहेरच्या म्हणजेच वडिलांच्या नावाने आहे.

मुलीचा पासपोर्ट काढण्यासाठी सादर केलेल्या आईच्या आधार कार्डवर आईच्या वडिलांच्या नावाचा उल्लेख होता, तर मुलीच्या नावापुढे तिच्या वडिलांचे म्हणजेच श्रद्धा यांच्या पतीचे नाव आहे. यामुळे नावात तफावत जाणवल्याने तीन वर्षांच्या मुलीस पासपोर्ट नाकारण्यात आला.

याविरोधात ॲड. गौरव एल. देशपांडे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. ॲड. देशपांडे यांनी शासनाने जन्म प्रमाणपत्रामध्ये एक कॉलम वाढवून आईच्या दोन्ही नावांची तरतूद करण्याची सूचना केली.

Beed News: अवादा कंपनीच्या विरोधात उपोषण; उपोषणकर्त्याच्या आईचे निधन, मृतदेह आंदोलनस्थळी, प्रशासनाची धावपळ, तहसीलदारांचे आश्वासन

मुलाचे जन्म प्रमाणपत्र महापालिका अथवा नगरपालिका निर्गमित करते. तेव्हा रुग्णालयात जन्मलेल्या मुलाची नोंदणी केल्यानंतर जन्म प्रमाणपत्र देताना त्यात बाळाच्या आईच्या नावाचा उल्लेख करताना लग्नापूर्वीचे नाव व लग्नानंतरचे नाव घ्यावे, असे नमूद केले. खंडपीठाने यासंबंधी राज्याला निर्देश देताना याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले. शासनातर्फे सहायक सरकारी वकील राधाकृष्ण इंगोले पाटील यांनी काम पाहिले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.