मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफोर्ड टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियाची खराब स्थिती आहे. इंग्लंडची टीम 186 धावांनी आघाडीवर असून त्यांचे तीन विकेट अजून शिल्लक आहेत. इंग्लंड टीमच्या 7 विकेटवर 544 धावा झाल्या आहेत. इंग्लंडची टीम आधीच मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. आता चौथा कसोटी सामना जिंकल्यास ते मालिकेत विजयी आघाडी घेतील. मग, पाचवा कसोटी सामना फक्त औपचारिकता मात्र ठरेल. रोहित शर्मा आणि विराट कोहलीशिवाय टीम इंडिया पहिलीच मोठी सीरीज ती सुद्धा इंग्लंड सारख्या संघाविरुद्ध खेळत आहे. नेतृत्वाची धुरा युवा कर्णधार शुबमन गिलच्या खांद्यावर आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा सहजतेने सामना केला. इंग्लंडचे फलंदाज ज्या पद्धतीने खेळत होते, त्यामुळे टीम इंडियाच्या युवा खेळाडूंचे खांदे पडलेले.
भारताच्या युवा संघाचं हे जे मनोधैर्य खच्ची झालय, त्यातून त्यांना बाहेर काढणं गरजेच आहे असं इंग्लंडचा माजी कर्णधार माइक आर्थटनला वाटतं. त्यासाठी आर्थटनने रवी शास्त्री यांना भारतीय ड्रेसिंग रुममध्ये जाण्याचा सल्ला दिलाय. रवी शास्त्री राहुल द्रविड येण्याआधी टीम इंडियाचे हेड कोच होते. शास्त्री उत्कृष्ट मॅन मॅनेजर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात अनेकदा त्यांनी आपल्या शब्दांनी टीममध्ये जोश भरला आहे. खेळाडूंचा उत्साह वाढवून उत्तम कामगिरीसाठी त्यांना प्रोत्साहित केलय. इंग्लंडला रोखण्यासाठी शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाला अशाच टॉनिकची गरज आहे असं माइक आर्थटन यांना वाटतं.
रवी शास्त्री काय म्हणाले?
इंग्लंडने 460 धावांचा टप्पा पार केल्यानंतर रवी शास्त्री यांची कॉमेंट्री बॉक्समध्ये एन्ट्री झाली. त्यावेळी इंग्लिश टीमकडे 100 पेक्षा जास्त धावांचा लीड होता. ‘रवी तू तिथे जा, तुझ्या टीमला ड्रेसिंग रुममध्ये प्रोत्साहनाची गरज आहे’ असं आर्थटन म्हणाले. मँचेस्टर टेस्टमध्ये टीम इंडिया अडचणीत असल्याचं शास्त्री यांनी मान्य केलं. प्लेइंग इलेव्हन निवडताना टीम इंडियाने काही चुका केल्याचं शास्त्री म्हणाले. अंशुल कंबोज आणि शार्दुल ठाकूर त्यांचे तिसरे आणि चौथे वेगवान गोलंदाज आहेत. सर्व काम करण्याची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजवर आहे. “प्रसिद्ध कृष्णा या टीममध्ये असता, तर शॉर्ट बॉल आणि इतर मार्गाने त्याच्या वेगवान गोलंदाजीचा फायदा उचलता आला असता” असं रवी शास्त्री म्हणाले.