नोकरीचं ऑफर लेटर आलंय? आनंदात साईन करू नका, आधी 'या' 7 गोष्टी नीट तपासा
Tv9 Marathi July 26, 2025 04:45 PM

नवीन नोकरीचं ऑफर लेटर हातात येताच बहुतेकजण आनंदाने उड्या मारायला लागतात. काही तर इतके उत्साहित होतात की ना नीट वाचता, ना समजून घेता लगेचच ऑफर लेटरवर साईन करून टाकतात. पण ही घाई-गडबड भविष्यात तुमच्यासाठी मोठं नुकसान ठरू शकतं. ऑफर लेटर हे एक अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र असतं, जे तुमच्या आणि कंपनीच्या नात्याची अट ठरवतं. त्यामुळे ऑफर स्वीकारण्याआधी काही बाबी काटेकोरपणे तपासणं खूप गरजेचं असतं.

काय चेक करावं ऑफर लेटरमध्ये?

1. जॉब टायटल आणि विभाग : लेटरमध्ये तुमचं कामाचं पद, विभाग आणि कामाचं ठिकाण स्पष्ट दिलं गेलंय का, हे पाहा. उदाहरणार्थ, जर तुम्ही ‘प्रोडक्ट मॅनेजर’ साठी अर्ज केला होता आणि ऑफर लेटरमध्ये ‘असिस्टंट मॅनेजर’ लिहिलं असेल, तर भविष्यात प्रमोशन किंवा जबाबदाऱ्यांमध्ये गोंधळ होऊ शकतो.

2. पगार आणि भत्त्यांचा तपशील : CTC म्हणजे एकूण पगार, बेसिक पगार, HRA, ट्रॅव्हल अलाऊन्स, मेडिकल, बोनस, PF आणि ग्रॅच्युटी यांचा स्पष्ट ब्रेकअप असणं आवश्यक आहे. अनेकदा CTC मध्ये नॉन-कॅश फायदे असतात, ज्यामुळे घरपोच पगार अपेक्षेपेक्षा कमी मिळतो. बोनस हमी आहे की परफॉर्मन्स बेस्ड हेही पाहा. आधीच्या नोकरीचा पगार ब्रेकअप समोर ठेवून तुलना करा.

3. वर्क लोकेशन आणि टाइमिंग : तुमचं ऑफिस नेमकं कुठं आहे, ते हायब्रीड आहे की फुलटाइम ऑफिस, आणि कामाची वेळ काय आहे (9-5 की शिफ्ट्स)? लोकेशन अस्पष्ट असल्यास, उदा. ‘रायगड’ असं दिलंय पण प्रत्यक्षात ऑफिस मुंबईत असेल, तर तुमचं बजेट, प्रवास, आणि राहणीमान पूर्णपणे बदलू शकतं.

4. जॉब कॉन्ट्रॅक्ट आणि प्रोबेशन : तुमची नोकरी कायमस्वरूपी आहे की करारावर? प्रोबेशन किती महिने आहे (3 की 6 की 12)? प्रोबेशन दरम्यान सुट्ट्या, हेल्थ इन्शुरन्स मिळणार का? प्रोबेशनमुळे कधी कधी पगार कमी असतो आणि सुरक्षा कमी असते, त्यामुळे ही माहिती स्पष्ट असावी.

5. नोटिस पिरियड आणि टर्मिनेशनच्या अटी : नोकरी सोडायची झाल्यास किती महिन्यांचा नोटिस पिरियड आहे (उदा. 1-3 महिने)? टर्मिनेशन कसं होईल? काही कंपन्या कारण न देता काढून टाकतात, अशा अटी असल्यास तुम्हाला पुढे अडचण येऊ शकते. नोटिस पिरियड जास्त असेल (उदा. 90 दिवस), तर नवीन नोकरी मिळवणं कठीण होऊ शकतं.

6. लाभ आणि कंपनीच्या धोरणांची माहिती : मेडिकल इन्शुरन्स, सुट्ट्यांचं धोरण (सिक लीव्ह, कॅज्युअल), रिटायरमेंट फायदे यासारख्या गोष्टी तपासा. याचा तुमच्या दीर्घकालीन सुरक्षिततेवर परिणाम होतो. तुम्हाला आठवड्याचा सुट्टीचा दिवस काय आहे, हेही आधीच कळवा.

7. ऑफर लेटरची वैधता आणि साईन : तुमचं ऑफर लेटर कंपनीच्या लेटरहेडवर आहे का? त्यावर HR किंवा अधिकृत व्यक्तीचे साईन आहेत का? आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स स्पष्ट दिलेल्या आहेत का, हे नक्की पहा. फेक ऑफर लेटरपासून वाचण्यासाठी कंपनीची वेबसाईट आणि HR कडून खात्री घ्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.