Crop Loss: अवकाळीची १९ कोटींची भरपाई मंजूर; २३ हजार ४४५ शेतकऱ्यांचे नुकसान
esakal July 26, 2025 11:45 PM

अहिल्यानगर : अवकाळी पावसाने जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. एप्रिल आणि मे या दोन महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील १० हजार ६४८ हेक्टर क्षेत्रातील फळबाग, उन्हाळी पिकांचे नुकसान झाले. २३ हजार ४४५ शेतकऱ्यांना अवकाळीचा तडाखा बसला होता. या शेतकऱ्यांसाठी १८ कोटी ९३ लाख ६ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

जिल्ह्यात यावर्षी एप्रिल महिन्यात दक्षिण आणि उत्तर भागातील अनेक तालुक्यांना अवकाळीचा तडाखा बसला. मे महिन्यात सर्वाधिक अवकाळी पावसाची नोंद झाली. विशेषतः जिल्ह्याच्या दक्षिण भागातील जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, पारनेर, नगर, पाथर्डी या तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला.

एप्रिल आणि मे महिन्याच्या कालावधीत आंबा, डाळिंब, मोसंबी, चिकू, द्राक्षे, पपई या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मका, कांदा, उन्हाळी बाजरी, भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्यात उदभवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीसाठी नागरिकांना मदत देण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) ची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये केंद्र शासनाकडून ७५ टक्के व राज्य शासनाकडून २५ टक्के याप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जात आहे.

आपत्कालिन नुकसान भरपाईसाठी शासकीय पंचनामा आवश्यक आहे. फळबाग आणि शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी कृषी विभाग आणि महसूल विभागाचा पंचनामा आवश्यक असतो. जिल्हा प्रशासनाच्या वतीने हे पंचनामे करण्यासाठी जादा अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ४ हजार १२७ हेक्टरमधील फळबाग आणि पिकांचे नुकसान झाले. ७ हजार २६८ शेतकरी बाधित झाले होते. या शेतकऱ्यांना ७ कोटी १८ लाख ८६ हजार नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. मे महिन्यात जिल्ह्यातील ६ हजार ५२१ हेक्टरवरील बागा आणि पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे १६ हजार १७७ शेतकरी बाधित झाले. या शेतकऱ्यांना ११ कोटी ७४ लाख २० हजारांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.

Balasaheb Thorat: सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना फसवले; बाळासाहेब थोरात, महायुतीमुळे महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे सुरू निधी हस्तांतरास बंदी

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात भरपाईची रक्कम दिली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्ज किंवा अन्य खात्यात हा निधी हस्तांतरीत करू नये, असे सक्त आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना निधी मिळाल्यानंतर त्याची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.