संततधार पावसाने रस्त्यांची दैना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : मागील सहा दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने मुंबईतील रस्त्यांची दैना झाली आहे. रस्त्यांमध्ये ठिकठिकाणी खड्डे पडले असून, त्याचा वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे; मात्र मुंबई महापालिकेने सध्या मुंबईत फक्त ४७४ खड्डे शिल्लक असल्याचा दावा केला आहे.
गेल्या सहा दिवसांपासून मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने मुंबईतील रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. प्रत्येक विभागात रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांचा स्थानिकांना त्रास होत असून, खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. पावसामुळे खड्ड्यांची संख्या वाढली असून, नागरिकांची गैरसोय होत आहे. पालिकेने खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे, पण ते पुरेसे नसल्याची नागरिकांची भावना आहे.
खड्डे बुजवताना मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे; मात्र पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईतील रस्त्यांवर हे तंत्रज्ञान टिकत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. रस्त्यातील खड्ड्यांवरून शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी महायुतीला टीकेचे लक्ष बनवले आहे; मात्र खड्ड्यांचे केवळ राजकारण होत आहे. नागरिकांचा त्रास वाढत असल्याचे दिसत आहे.
---
रस्त्यातील खड्डे
जुलै महिन्यातील खड्डे - ३०१८
भरलेले खड्डे - २५४४
शिल्लक खड्डे - ४७४