महाड, ता. २७ (बातमीदार) : विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी जाण्याची आतुरता कोकणवासीयांना लागली आहे. दरवर्षी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे कोंडीचा सामना करत प्रवास करण्याची वेळ येते. यंदाही तशीच परिस्थिती असल्याने महामार्गावरील प्रवासात विविध संकटांना सामोरे जाण्याची वेळ येणार असल्याने गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण फेरले जाणार आहे.
गणेशोत्सव काळात मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची विक्रमी वाहतूक होत असते. असे असतानाही रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांचे विघ्न अजूनही कायम आहे. तब्बल १८ वर्षे झाली तरी या महामार्गाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी मंत्री, लोकप्रतिनिधी या रस्त्याची पाहणी करून आश्वासन देतात, परंतु या रस्त्याची परिस्थिती काही सुधारत नसल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास अतिशय धोकादायक झाला आहे. माणगाव, इंदापूर, लोणेरे, कोलाड तसेच नागोठणे येथे रस्त्यावरील खड्डे तसेच अर्धवट कामांमुळे कोंडी होणार आहे. तसेच माणगाव, इंदापूर गावांमधील अरुंद रस्त्याने वाहनांबरोबर प्रवाशांची कोंडी होणार आहे.
--------------------------------
अडथळ्यांचे प्रमुख टप्पे
- कोलाड, लोणेर येथील उड्डाणपुलाची कामे खोळंबली.
- सेवा रस्त्यावर पडलेले खड्डे.
- नागोठणे ते कोलाड नाकादरम्यान उड्डाणपुलाची ६० टक्के कामे अपूर्ण.
- अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक.
- रस्त्यांवर चिखल साचल्याने चालकांची तारेवरची कसरत.
------------------------------------
वाहतूक कोंडीचे संकट
गणेशोत्सव काळात मोठी वाहतूक, खासगी वाहनांची वाढणारी संख्या, त्यातच एसटी महामंडळाकडून सोडल्या जाणाऱ्या बस, खासगी बस, वाहने यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. महामार्ग सुस्थितीत नसल्याने कोंडी टाळण्यासाठी पोलिस यंत्रणेवर ताण पडत आहे.
--------------------------------------
टोलनाके तयार
मराष्ट्रीय महामार्गावरील रायगड जिल्ह्यातील सुकेळी खिंड, पोलादपूरजवळ चांढेवे टोलनाका तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूणमधील लोटे येथील टोलनाके बांधून तयार आहेत. केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची अधिसूचना निघणे बाकी आहे. त्यानंतर या मार्गावर टोलवसुली केली जाणार आहे.
----------------------------------------
मंत्र्यांकडून आश्वासनावर बोळवण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वासाठी जनआक्रोश समितीने सहा दिवस माणगाव येथे उपोषण केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. काम सोडून गेलेल्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते, मात्र मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर महामार्गाची परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
------------------------------------------
पेण, नागोठणे पट्ट्यात अनेक ठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या महामार्गावर १८ वर्षांत अपघातात अनेकांचे बळी गेले आहेत, तर अनेक जण कायमस्वरूपी जायबंदी झाले आहेत. त्या कुटुंबांना नुकसानभरपाई द्यावी.
- सुभाष मोरे, जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र वाहतूक सेना