पाचव्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार की नाही? शुबमन गिल म्हणाला…
GH News July 28, 2025 02:07 AM

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेतील चार सामन्यांचा खेळ संपल्यानंतर रंगत वाढली आहे. कारण मालिका विजयाचं गणित अजून काही सुटलं नाही. चार सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने 2-1 ने आघाडी आहे. त्यामुळे पाचव्या सामन्याचं महत्त्व वाढलं आहे. इंग्लंडकडे मालिका विजयाचं तर भारताकडे मालिका ड्रॉ करण्याची संधी आहे. इंग्लंडने पाचवा आणि शेवटचा सामना जिंकला किंवा ड्रॉ केला तर मालिका खिशात घालेल. तर भारताने हा सामना जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. खरं तर चौथ्या कसोटी सामन्यात भारताची स्थिती नाजूक होती. हा सामना भारत गमवेल असंच वाटत होतं. पण भारताने चौथ्या आणि पाचव्या दिवशी कडवी झुंज दिली आणि सामना फिरवला. इंग्लंडच्या तोंडातून विजयाचा घास खेचून आणला आणि सामना ड्रॉ केला. यामुळे इंग्लंडचं मालिका विजयाचं स्वप्न लांबलं आणि भारताला आणखी एक संधी मिळाली आहे. त्यामुळे पाचवा कसोटी सामना सामना हा खूपच महत्त्वाचा आहे. अशा स्थितीत स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही असा प्रश्न आहे. यावर कर्णधार शुबमन गिलने आपलं मत मांडलं.

समालोचकाने जसप्रीत बुमराह पाचव्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही असा प्रश्न विचारला. त्यावर शुबमन गिलने सांगितलं की, ‘आताच काही सांगू शकत नाही. तुम्हाला ओव्हल कसोटी सामन्यापर्यंत थांबावं लागेल.’ त्यामुळे जसप्रीत बुमराहबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. कारण मालिका सुरु होण्यापूर्वी बुमराह फक्त तीन कसोटी सामने खेळणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार, जसप्रीत बुमराह पहिल्या कसोटीत खेळला. दुसऱ्या कसोटीत त्याला आराम दिला गेला. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळला. त्यामुळे त्याच्या वर्कलोड मॅनेजमेंटप्रमाणे तो तीन सामने खेळला आहे. मात्र मालिकेची स्थिती आणि गरज पाहून पाचव्या कसोटी सामन्यात खेळू शकतो. आता यासाठी ओव्हल कसोटी सामन्याच्या नाणेफेकीपर्यंत वाट पाहावी लागेल.

शुबमन गिल कसोटी कर्णधार झाल्यापासून एकही नाणेफेक जिंकलेला नाही. आतापर्यंतच्या चारही कसोटी सामन्यात नाणेफेक गमावली आहे. त्यामुळे त्याला नाणेफेकीबाबतही प्रश्न विचारला गेला. तेव्हा शुबमन गिलने सांगितलं की, आम्ही जोपर्यंत सामना जिंकतो आहोत तिथपर्यंत मला खरंच नाणेफेकीबाबत काहीच चिंता नाही. त्याने नाणेफेकीला फार काही महत्त्व दिलं नाही. दरम्यान, चौथ्या कसोटीचा निकाल पाहता पाचव्या कसोटीत फार काही बदल होईल असं वाटत नाही. कुलदीप यादवला संधी मिळेल की नाही हे देखील गुलदस्त्यात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.