ENG vs IND 4th Test: जडेजाने इतिहास घडवला! गॅरी सोबर्स यांचा ५९ वर्षे जुन्या विक्रमाची बरोबरी; लक्ष्मणच्याही पंक्तीत स्थान
esakal July 28, 2025 02:45 AM

थोडक्यात:

  • इंग्लंडविरुद्ध चौथ्या कसोटीत रवींद्र जडेजाने भारताच्या दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले.

  • यासोबतच जडेजाने मोठे विक्रम करताना व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गॅरी सोबर्स यांची बरोबरी केली आहे.

  • जडेजाने वॉशिंग्टन सुंदरसोबत शतकी भागीदारीही केली.

भारत आणि इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात सुरू आहे. हा सामना रोमांचक स्थितीत आहे. हा सामना देखील शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रापर्यंत रंगला आहे.

भारतासमोर हा सामना वाचवण्याचे आव्हान पाचव्या दिवशी होते. अशावेळी भारताकडून शुभमन गिल, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी दमदार फलंदाजी केली आहे. यादरम्यान रवींद्र जडेजाने इतिहास रचला आहे.

ENG vs IND, 4th Test: शुबमन गिल खऱ्या अर्थानं ठरतोय प्रिन्स? 'हा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई; विराटचाही विक्रम मोडला

या सामन्यात पहिल्या डावात भारताने ३५८ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावा करत भारताविरुद्ध ३११ धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात चौथ्या दिवशी फलंदाजीला उतरला. यावेळी भारताने पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन यांच्या विकेट्स गमावल्या.

पण त्यानंतर शुभमन गिल आणि केएल राहुल यांनी दीडशतकी भागीदारी करत संपूर्ण दिवस खेळून काढला. पाचव्या दिवशीही ते संयमी खेळ करत होते. मात्र बेन स्टोक्सने केएल राहुलल ९० धावांवर बाद केले. मात्र त्यानंतर शुभमन गिलला वॉशिंग्टन सुंदरची साथ मिळाली. यादरम्यान, शुभमन गिलने त्याचे कसोटी कारकिर्दीतील ९ वे शतक पूर्ण केले.

पण शतकानंतर त्याला जोफ्रा आर्चरने १०३ धावांवर बाद करत भारताला चौथा धक्का दिला. यानंतर सुंदरला साथ देण्यासाठी रवींद्र जडेजा उतरला होता. जडेजाला पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाले. त्याचा झेल जो रुटकडून सुटला. पण त्यानंतर जडेजाने त्याचा फायदा उचलला. त्याने वॉशिंग्टन सुंदरसोबत शतकी भागीदारी करत आधी भारताची ३११ धावांची पिछाडी भरून काढण्यात मोलाचा वाटा उचलला. यादरम्यान सुंदर आणि जडेजा या दोघांनीही अर्धशतके पूर्ण केली.

जडेजाने घडवला इतिहास

जडेजाने सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत ४०० धावाही पार केल्या आहेत. तसेच इंग्लंडमध्ये कसोटीत १००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे जडेजा इंग्लंडमध्ये कसोटीत १००० धावा करणारा सातवा भारतीय खेळाडू आहे.

यापूर्वी सचिन तेंडुलकर (१५७५), राहुल द्रविड (१३७६), सुनील गावसकर (११५२), केएल राहुल (११२५*), विराट कोहली (१०९६), रिषभ पंत (१०३५*) यांनी असा कारनामा केला आहे.

याशिवाय जडेजा आता इंग्लंडमध्ये कसोटीत १००० धावा आणि ३० हून अधिक विकेट्स घेणारा गॅरी सोबर्स यांच्यानंतरचा दुसराच परदेशी खेळाडू आहे. तसेच मायदेशाबाहेरील एकाच देशात १००० धावा आणि ३० हून अधिक विकेट्स कसोटी घेणारा तो तिसरा अष्टपैलू खेळाडू आहे. यापूर्वी विलफ्रेड ऱ्होड्स आणि सोबर्स यांनी असा कारनामा केला आहे. तसेच हा पराक्रम करणारा जडेजा भारताचा पहिलाच खेळाडू आहे.

मायदेशाबाहेरील एकाच देशात कसोटीत १०००+ धावा आणि ३० + विकेट्स घेणारे अष्टपैलू
  • विलफ्रेड ऱ्होड्स (इंग्लंड) - ऑस्ट्रेलियामध्ये (१०३२ धावा आणि ४२ विकेट्स)

  • गॅरी सोबर्स (वेस्ट इंडिज) - इंग्लंडमध्ये (१८२० धावा आणि ६२ विकेट्स)

  • रवींद्र जडेजा (भारत) - इंग्लंडमध्ये (१०००* धावा आणि ३४ विकेट्स)

ENG vs IND, 4th Test: केएल राहुलचं शतक थोडक्यात हुकलं, पण ४६ वर्षात कोणत्याच भारतीय सलामीवीराला न जमलेला विक्रम नोंदवला व्हीव्हीएस लक्ष्मणची बरोबरी

जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत पाचवे अर्धशतक ठोकले आहे. तो या मालिकेत ६ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. त्यामुळे ६ किंवा खालच्या क्रमांकावर खेळताना एकाच कसोटी मालिकेत ५ वेळा ५० धावांचा टप्पा पारकरणारा तो व्हीव्हीएस लक्ष्मणनंतरचा दुसराच भारतीय खेळाडू आहे. व्हीव्हीएस लक्ष्मणने २००२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ६ किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना ५ अर्धशतके केली होती.

तसेच इंग्लंडमध्ये एकाच कसोटी मालिकेत ६ किंवा खालच्या क्रमांकावर खेळताना एकाच कसोटी मालिकेत ५ वेळा ५० धावांचा टप्पा पार करणारा जडेजा गॅरी सोबर्स यांच्या नंतरचा दुसराच खेळाडू आहे. सोबर्स यांनी १९६६ साली इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत ५ अर्धशतके केली होती.

एकाच कसोटी मालिकेत ६ किंवा खालच्या क्रमांकावर सर्वाधिकवेळा ५०+ धावा करणारे भारतीय
  • ५ वेळा - व्हीव्हीएस लक्ष्मण (विरुद्ध वेस्ट इंडिज, २००२)

  • ५ वेळा - रवींद्र जडेजा (विरुद्ध इंग्लंड,२०२५)

  • ४ वेळा - दत्तू फडकर (विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १९४८-४९)

  • ४ वेळा - एमएस धोनी (विरुद्ध इंग्लंड, २०१४)

  • ४ वेळा - आर अश्विन (विरुद्ध इंग्लंड, २०१६-१७)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.