यजमान इंग्लंड क्रिकेट टीम मँचेस्टर कसोटी सामन्यातील पहिले 4 दिवस मजबूत स्थितीत होती. त्यामुळे टीम इंडियावर पराभवाची टांगती तलवार होती. मात्र तेव्हा टीम इंडियाच्या प्रमुख फलंदाजांनी निर्णायक भूमिका बजावली आणि चमकदार कामगिरी करुन दाखवली. त्यामुळे टीम इंडियाने सामना शेवटच्या सत्रापर्यंत पोहचवला. भारतीय फलंदाजांनी चिवट खेळी करत इंग्लंडला विजयापासून दूर लोटलं. त्यामुळे सामना अनिर्णित राहणार असल्याचं स्पष्ट झालं. मात्र त्यानंतरही भारतीय फलंदाज इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करत होते. त्यामुळे इंग्लंड टीम रडकुंडीला आली. त्यामुळे इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स टीम इंडियासमोर मॅच लवकर ड्रॉ करण्यासाठी गयावया करु लागला. मात्र भारताने ही ऑफर धुडकावून लावली आणि स्टोक्सला तोंडावर पाडलं.
मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात इंग्लंडने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. इंडियाने 358 धावांपर्यंत मजली मारली. इंग्लंडने प्रत्युत्तरात 669 धावा केल्या. इंग्लंडला अशाप्रकारे पहिल्या डावात 311 धावांची आघाडी मिळवली. प्रत्युत्तरात भारताची दुसऱ्या डावात वाईट अवस्था झाली. भारताने झिरोवर 2 विकेट्स गमावल्या.
यशस्वी जैस्वाल आणि साई सुदर्शन या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर केएल राहुल याने 90 धावा केल्या. तर कर्णधार शुबमन गिल याने शतकी खेळी केली. शुबमनने 103 धावा केल्या. केएल-शुबमनने तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. तर शुबमन आणि सुंदरने चौथ्या विकेटसाठी 34 धावा जोडल्या.
बेन स्टोक्सची ऑफर धुडकावली
त्यानंतर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समचार घेतला. या जोडीने इंग्लंडला झुंजवलं. या दोघांनी आघाडी मोडीत काढली. त्यानंतर भारताने आघाडीचं खातं उघडलं. त्यामुळे सामन्याचा निकाल लागणार नसल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे स्टोक्स याने सामना संपण्याच्या 1 तासआधीच ड्रॉ करण्यासाठी ऑफर दिली. मात्र जडेजाने ही ऑफर नाकारली. यामध्ये सुंदरनेही जडेजालाही साथ दिली.
स्टोक्सने मॅच ड्रॉ करण्याची ऑफर दिली तेव्हा जडेजा आणि सुंदर शतकाच्या उंबरठ्यावर होते. जडेजा 89 तर सुंदर 80 धावांवर खेळत होते. दोघांनी संघर्ष करत सामना अनिर्णित राखण्यात मोठी भूमिका बजावली. त्यामुळे दोघांनी शतक करुनच परतायचं असं ठरवलं. त्यानंतर जडेजा आणि सुंदर या दोघांनी शतक पूर्ण केलं. जडेजा-सुंदरच्या शतकानंतर टीम इंडियाने थांबण्याचा निर्णय घेतला आणि सामना अनिर्णित राहिला.