इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवसापर्यंत पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने पाचव्या आणि अंतिम दिवशी जोरदार कमबॅक केलं. भारताने मँचेस्टर कसोटीतील पाचव्या दिवशी 27 जुलैला 311 धावांची आघाडी मोडीत काढली आणि इंग्लंडला घाम फोडला. भारताच्या फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत इंग्लंडला विजयापासून दूर केलं आणि सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवलं. भारताकडून दुसऱ्या डावात वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, शुबमन गिल या तिघांनी शतक केलं. तर केएल राहुल याने 90 धावा केल्या. भारताने अशाप्रकारे 4 विकेट्स गमावून 425 धावा केल्या. इंग्लंडसाठी 300 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेऊनही सामना जिंकता न येणं मानसिकरित्या मोठा झटका ठरला.
तर संघर्ष करत सामना बरोबरीत राखल्याने भारतीय क्रिकेटपटूंसह चाहत्यांमध्ये समाधानाचं वातावरण होतं. मात्र काही मिनिटांत भारतासाठी वाईट बातमी आली. भारताचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत याला पाचव्या आणि अंतिम सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलंय. त्यामुळे भारताला मोठा झटका लागलाय. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे. तसेच बीसीसीआयने पंतच्या जागी बदली खेळाडूचं नावही जाहीर केलं आहे.
पंतच्या जागी कुणाला संधी?
पंतला इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात बॅटिंग करताना दुखापत झाली होती. पंतला रचनात्मक फटका मारताना बॉल पायावर लागला. त्यामुळे पंत विव्हळला. पंतला गाडीद्वारे मैदानाबाहेर नेण्यात आलं. वैदयकीय तपासणीनंतर पंतच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर असल्याचं निदान झालं. त्यामुळे पंतला पाचव्या सामन्यातून बाहेर झाल्याची माहिती बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
तसेच बीसीसीआयचं वैद्यकीय टीम पंतवर लक्ष ठेवून आहे. पंतच्या जागी पाचव्या कसोटीसाठी एन जगदीशन याचा समावेश करण्यात आल्याचं बीसीसीआयने प्रसिद्धी पत्रकात नमूद केलं आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या कसोटी निवृत्तीनंतर ऋषभ पंतला इंग्लंड दौऱ्याआधी उपकर्णधारपदी नियुक्त करण्यात आलं. पंतने या मालिकेत विकेटकीपर, उपकर्णधार आणि फलंदाज या तिन्ही भूमिका चोखपणे बजावल्या.
पंत या मालिकेत चौथ्या कसोटीनंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. पंतने 4 कसोटी सामन्यांमधील 7 डावांत 77.63 च्या स्ट्राईक रेटने आणि 68.42 सरासरीने 17 षटकार आणि 49 चौकारांच्या मदतीने 479 धावा केल्या. पंतने या दरम्यान 2 शतकं आणि 3 अर्धशतकं झळकावली.