गेल्या महिन्यात इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाले होते. या युद्धात अमेरिकेनेही इराणवर हल्ला केला होता. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला युद्धबंदीसाठी अल्टिमेटम दिला आहे. मात्र याआधी इराणने अमेरिकेवर हल्ला करण्यास सक्षम असणारे खतरनाक क्षेपणास्त्र बनवले आहे. खोरमशहर-5 असे या क्षेपणास्त्राचे नाव आहे. हे इराणमधून थेट अमेरिकेवर हल्ला करू शकते. हे इराणचे सर्वात धोकादायक क्षेपणास्त्र आहे. यामुळे अमेरिकेची चिंता वाढली आहे.
मेहर न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार इराणने खोरमशहर सीरीजमधील पहिल्या 4 प्रकारांची चाचणी घेतली होती, त्यामुळे जगाला त्याबाबत माहिती मिळाली होती. मात्र आता इराणने शांतपणे खोरमशहर-5 असे या क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे, त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे.
खोरमशहर 5 क्षेपणास्त्राची ताकद किती आहे?
खोरमशहर हे इराणमधील एक प्रसिद्ध शहर आहे. इराणने याच नावाने क्षेपणास्त्र बनवले आहे. खोरमशहर-5 हे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र मानले जाते. या क्षेपणास्त्रची रेंज 12 हजार किलोमीटर आहे. यात 2 टन वॉरहेड आहे. याचा वेग 16 एमएसी आहे. खोरमशहर-5 तेहरानमधून सुटल्यानंतर 36 मिनिटात अमेरिकेपर्यंत पोहोचू शकते. इराणची राजधानी तेहरानपासून अमेरिकेचे अंतर सुमारे 11 हजार किमी आहे. त्यामुळे याच्या मदतीने इराण अमेरिकेचा खात्मा करु शकते.
इस्रायलविरुद्धच्या युद्धादरम्यान इराणने इस्रायलच्या अनेक शहरांवर हल्ला केला होता, त्यामुळे इस्रायलच्या अनेक शहरांचे मोठे नुकसान झाले होते. यात खोरमशहर 5 चा वापर झाला नव्हता. खोरमशहर 5 चे वॉरहेड २ टन आहे, जे अमेरिकन बंकर बस्टर बॉम्बेसारखे आहे. अमेरिकेने हाच बॉम्ब इराणच्या 3 अणु तळांवर टाकला होता.
इराणला 30 ऑगस्टपर्यंत मुदत
युरेनियम तयार करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी अमेरिकेने इराणला 30 ऑगस्टची अंतिम मुदत दिलेली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते की, आम्ही 30 ऑगस्टपर्यंत वाट पाहू. तोपर्यंत इराणने निर्णय घेतला नाही तर पुढचा निर्णय घेतला जाईल.
युरेनियम तयार करण्याबाबत अमेरिका आणि इराणमध्ये मतभेद आहेत. अमेरिका इराणला युरेनियमचे उत्पादन रोखण्यास सांगत आहे. इराणने म्हटले की आम्ही युरेनियमचा वापर अण्वस्त्रे बनवण्यासाठी करणार नाही आणि उत्पादन देखील थांबवणार नाही. दरम्यान, अमेरिकेने जूनमध्ये इराणमधील 3 ठिकाणी हल्ला केला होता. यात इराणच्या अणुतळांचे नुकसान झाले होते.