टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. उभयसंघात 4 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. तर पाचवा आणि अखेरचा सामना हा 31 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियासाठी ऑगस्ट महिना महत्त्वाचा असणार आहे. कारण 9 सप्टेंबरपासून आशिया कप 2025 स्पर्धेला सुरुवात होत आहे. टीम इंडिया आशिया कप स्पर्धेतील आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला खेळणार आहे. तर टीम इंडिया आशिया कप मोहिमेतील आपल्या दुसऱ्या सामन्यात 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे.
भारतीय संघाची ऑगस्ट महिन्यातील सुरुवात इंग्लंड विरूद्धच्या पाचव्या कसोटी सामन्याने होणार आहे. 1 ऑगस्ट हा या पाचव्या कसोटी सामन्यातील दुसरा दिवस असणार आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी हा सामना कोणत्याही स्थितीत जिंकावा लागणार आहे. अंतिम सामना बरोबरीत राहिला तरीही इंग्लंड ही मालिका 2-1 ने जिंकेल. त्यामुळे भारतासाठी पाचवा सामना ‘करो या मरो’ असा आहे.
टीम इंडिया ऑगस्ट महिन्यात बांगलादेश दौऱ्यात 3 वनडे आणि 3 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार होती. मात्र बीसीसीआयने या दौऱ्याला स्थिगिती दिली. त्यामुळे आता टीम इंडिया 2026 मध्ये बांगलादेश दौऱ्यावर जाणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला टी 20i आणि वनडे सीरिजचा प्रस्ताव दिल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र आशिया कप स्पर्धेच्या 1 महिन्याआधी एकही सामना न खेळणं भारताला महागात पडू शकतं. त्यामुळे आता बीसीसीआय श्रीलंकेविरूद्धच्या 2 मालिकांसाठी ग्रीन सिग्नल देणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यातील पाचवा कसोटी सामना हा टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल. तर ही मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
तसेच भारतीय महिला क्रिकेट संघांचा ऑगस्ट महिन्यात एकही सामना नाही. भारतीय महिला संघ पुढील सामना सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे.
वेस्टइंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 1 ऑगस्टपासून 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. पाकिस्तानसाठी आगामी आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर ही मालिका फायदेशीर ठरु शकते. या मालिकेतील तिन्ही सामन्यांना भारतीय वेळेनुसार पहाटे साडे पाच वाजता सुरुवात होईल. त्यानंतर उभयसंघात 8 ते 12 ऑगस्टदरम्यान 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 10 ते 16 ऑगस्ट दरम्यान 3 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर 19 ते 24 ऑगस्टदरम्यान दोन्ही संघात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडणार आहे.