पोटाला कोरभर भाकर मिळेना, उपासमारीमुळे 147 लोकांचा मृत्यू, 40 हजार मुलांचा जीव धोक्यात
GH News July 29, 2025 02:08 AM

गाझा पट्टीत उपासमारीचे संकट ओढवले आहे. इस्रायलच्या मदत न पाठवण्याच्या निर्णयामुळे पॅलेस्टिनी लोकांना उपाशीपोटी झोपावे लागत आहे. उपासमारीमुळे गेल्या 24 तासात एका बाळासह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह इस्रायलने मदतीवर घातलेल्या बंदीपासून उपासमारीने 147 झाला आहे. यात 88 लहान मुलांचा समावेश आहे. आता स्थानिक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, वेळीच मदत नाही मिळाली तर 40 हजार बालकांचा मृत्यू होण्याची शक्यता आहे.

इस्रायलने मार्चमध्ये पॅलेस्टिनी भूभागावर अन्नधान्य आणि मदत पोहोचवण्यास पू्र्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे या भागात उपासमरीचे संटक ओढावले आहे. उपासमारीच्या या परिस्थितीमुळे इस्रायल समर्थक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही चिंता व्यक्त केली आहे. भुकेलेल्या पॅलेस्टिनी मुलांचे फोटो समोर आल्यानंतर ट्रम्प यांनी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.

लहान मुले कुपोषणाने ग्रस्त

गाझाच्या युद्धग्रस्त अल-शिफा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक मुळे कुपोषणामुळे आणि शिशु फॉर्म्युला नसल्यामुळे मरण पावली आहे. अल-शिफा रुग्णालयाचे संचालक मुहम्मद अबू सलमिया यांनी म्हटले की, याच कारणामुळे आणखी हजारो लोकांचा मृत्यू होण्याचा धोका आहे. गाझा पट्टीतील सर्व भाग उपासमारीच्या गंभीर टप्प्यावर पोहोचले आहेत, त्यामुळे आता लोकांच्या मृत्यूचा वेग आणखी वाढण्याची शक्यता अबू सलमिया यांनी वर्तवली आहे.

गाझाला मदत पाठवण्यासाठी इस्रायलवर दबाव

उपासमारीमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देश इस्रायलवर मदत पाठवण्यासाठी दबाव टाकत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी गाझाबाबतचा दृष्टिकोन बदलला असून गंभीर संकटाबाबत चिंती व्यक्त केली आहे.

गाझातील उपासमारीला इस्रायल जबाबदार

गाझातील उपासमारीला इस्रायल जबाबदार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले की, मला वाटते की इस्रायल मदतीचा निर्णय घेऊ शकते. मात्र त्यांच्याकडून अद्याप अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.’ ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांनीही ट्रम्प यांना मदतीसाठी इस्रायलवर दबाब टाकण्याचे आवाहन केले आहे. जॉर्डनच्या मदतीने गाझाला मदत पाठवण्यासाठी ब्रिटन तयार आहे. मात्र इस्रायलने याला अद्याप परवानगी दिलेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.