Kolhapur : सोडचिठ्ठी मिळूदे, पतीसह त्याच्या आयुष्यातील २ महिलांची वाट लागू दे; चिठ्ठी लिहून महिलेचं स्मशानभूमीत अघोरी कृत्य
esakal July 29, 2025 02:45 AM

पतीने सोडचिठ्ठी द्यावी आणि त्यासह दोन महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं अशी चिठ्ठी लिहून स्मशानात अघोरी प्रकार केल्याची घटना कोल्हापुरात समोर आलीय. स्मशानभूमीत बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल अन् हाताने लिहिण्यात आलेला एक कागद सापडला आहे. पतीसोबत संसार नीट होत नसल्यानं आणि सासरच्या छळाला त्रासलेल्या महिलेकडून हा प्रकार करण्यात आलाय. तिने पतीचं नाव चिठ्ठीत लिहिलंय, त्याच्यापासून सोडचिठ्ठी मिळावी असंही त्यात लिहिलं आहे.

अंधश्रद्धेचा वेगळाच प्रकार स्मशानभूमीत दिसून आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातल्या कूर इथं ही घटना घडलीय. पतीने सोडचिठ्ठी द्यावी आणि तीन जणांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं यासाठी महिलेनं हा प्रकार केला आहे. गावतल्या स्मशानभूमीत अशी चिठ्ठी ठेवल्यानं आणि अघोरी पूजा केल्यानं गावासह पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगली आहे. दरम्यान, अशा कृत्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि संतापाची लाट निर्माण झालीय.

तुम्ही कोण? विचारताच पंचायत सचिवावर भडकले आमदार; म्हणाले, इंग्लंडवरून आलायस का? अख्खा भारत मला ओळखतो

भुदरगड तालुक्यातल्या कूर गावात एका नागरिकाच्या अंत्यविधीची तयारी केली जात होती. त्यावेळी काही जण स्मशानभूमीत गेले असता तिथं हाताने लिहिलेला कागद आणि अघोरी प्रकार केला असल्याचं आढळून आलं. कागदावर एका महिलेचं नाव लिहिलं होतं. त्याखाली तिघांची नावे लिहून त्यांची वाट लागू द्या असं लिहिलेलं आढळलं. या घटनेमुळे अंधश्रद्धेतून होणाऱ्या अघोरी प्रकाराची चर्चा आता रंगली आहे.

Income Certificate : वर्षाला फक्त ३ रुपयांची कमाई, तहसिलदारांनी दिला उत्पन्नाचा दाखला; व्हायरल होताच केला खुलासा

याआधीही गावात चौकात, वाटेवर लिंबू, मिरची टाकण्याचे प्रकार घडले होते. पण आता थेट स्मशानभूमीतच अघोरी प्रकराने खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धा पसरवणाऱ्या आणि अशी कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी जनजागृतीची गरजही व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.