FIDE Women’s World Chess Championship tiebreak match: महाराष्ट्राची दिव्या देशमुख आणि आंध्र प्रदेशची कोनेरू हंपी यांच्यात महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना टाय ब्रेकरमध्ये खेळवला गेला. १५-१५ मिनिटांच्या दोन टायब्रेकरमध्ये दिव्याने पहिला सामना पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळला.
३८ वर्षीय अनुभवी खेळाडू कोनेरू हंपी व १९ वर्षीय युवा खेळाडू दिव्या देशमुख यांच्यामधील अंतिम फेरीचा दुसरा टप्पाही बरोबरीत (ड्रॉ) राहिला. त्यामुळे पहिल्या दोन टप्प्यांनंतर हंपी व दिव्या यांच्यामध्ये १-१ अशी बरोबरी झाली आणि त्यामुळे टायब्रेकमध्ये लढत रंगली.
पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना दिव्याने सावध सुरुवात केली. दोन्ही खेळाडूंनी सुरुवातीचे डावपेच समसमान खेळले. घोडा व प्यादे पुढे सरकावताना दोघीही वेळेचं गणित बसवताना दिसल्या. १६व्या चालीनंतर दिव्याने थोडा वेळ घेतला आणि हंपी थोडी शांत दिसली. १८व्या चातील हंपीने वजीर बाहेर काढला. मग दिव्याने तिचा हत्ती सरळ वजीरासमोर उभा केला आणि त्याला वाचवण्यासाठी f2 मध्ये प्यादा उभा केला होताच. हंपीला तिचा वजीर मागे घ्यावा लागला.
पण, १९व्या चालीपर्यंत हंपीचे पटावर वर्चस्व पाहायला मिळाले. पांढऱ्या मोहऱ्याने खेळतानाही दिव्या थोडी दडपणाखाली दिसत होती. २१ व्या चातील दिव्याने तिचा वजीर g4 मध्ये उभा केला आणि ही सामन्याला कलाटणी देणारी चाल ठरू शकते, असे समालोचक म्हणू लागले. हंपीला दिव्याच्या किंगसाईडवर काही दबाव आणण्याची संधी होती, पण तिला अजून ओपनिंग मिळालेली नाही, जर तिने मूव्ह २१ वर एफ५ मध्ये तिचा नाईट खेळला असता तर ती संधी मिळाली असती.
या सामन्यात विश्वनाथन आनंद यानेही समलाोचन केले. तो म्हणाला, "हंपीने चांगली सुरुवात केली आहे, असे दिसते. पेट्रोव्ह हंपीच्या कामगिरीचा एक महत्त्वाचा भाग आहे. या परिस्थितीत तुम्ही खूप मजबूत असाल. मला वाटते की ड्रॉ हा अजूनही सर्वात संभाव्य निकाल आहे. कदाचित काहीतरी अधिक तीव्र घडले असते. परंतु आता पांढऱ्या मोहऱ्यांसाठी कोणताही खरा धोका नाही. इथून हंपी जिंकू शकली तर मला आश्चर्य वाटेल."
३४व्या चालीत हंपीने हत्ती मारण्याच्या प्रयत्नात तिचा वजीर गमावला आणि सामन्याला अचानक कलाटणी मिळाली. दोन्ही खेळाडूंकडे शेवटची ४० सेकंद शिल्लक होती आणि आता दिव्याचे पारडे जड दिसत होते. दिव्या त्याच त्याच चाली वारंवार खेळताना दिसली. ८१व्या चालीनंतर हा सामना बरोबरीत सुटला आणि आता हंपी दुसऱ्या टाय ब्रेकरमध्ये पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळणार आहे.