Chhagan Bhujbal : एसटी कर्मचाऱ्यांसाठी भुजबळ मैदानात; "आईही दूध पाजत नाही रडल्याशिवाय, आता लढणार!"
esakal July 29, 2025 02:45 AM

जुने नाशिक: राज्य परिवहन महामंडळातील (एसटी) कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या, अपेक्षा आहेत. त्यासाठी लढले पाहिजे. रडल्याशिवाय तर आईदेखील दूध पाजत नाही. त्यामुळे लढणे आवश्यक आहे. आता वकीलपत्र घेतले आहे, असे जाहीर करतो.

मागण्या मान्यतेसाठी मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी येथे दिली. येथील कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.

संघटनेचे अध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार, लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष यतीन कदम, माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे, सुधाकर बडगुजर, सतीश मेटकरी, भाऊलाल तांबडे, मेळाव्याचे आयोजक व्यंकटेश मोरे, संघटनेच्या पद्मश्री राजे, अनुप खैरनार, राहुल आरोटे आदी उपस्थित होते.

एसटी महामंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या परिस्थितीवर श्री. भुजबळ म्हणाले, की गोरगरीब कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी आपण कुणालाही अंगावर घेण्यासाठी तयार आहोत. लढ्यात आपण एसटी कर्मचारी संघटनेच्या सोबत आहोत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी संघटनेचे पदाधिकारी, मंत्रिमंडळातील सहकारी यांच्यासह मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावले जातील. आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली संघटना सेवाशक्ती संघर्ष करत आहे. एसटी कर्मचारी अवघड परिस्थितीत खडतर हवामानात, अपुऱ्या सोयींमध्ये ही सेवा अखंड सुरू ठेवण्याचे काम करत आहे. या सर्वांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे.

एसटी सेवा फायद्यात कधी येईल, असे स्वप्न न बघता जनतेच्या सेवेसाठी आवश्यक त्या तरतुदी ‘एसटी’साठी कराव्याच लागणार आहेत. कर्मचाऱ्यांना योग्य ते वेतन मिळालेच पाहिजे. यासाठी आपण विधिमंडळात आणि मंत्रिमंडळातही आपण बोलून प्रश्न मार्गी लावले जातील, असे त्यांनी सांगितले.

वेतन आयोगाच्या बरोबरीने वेतन द्यावे

एसटी बस अतिशय जवळचे नाते आहे. माझ्या यशात ‘एसटी’ची साथ असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. ‘सरकारने बस प्रवासात महिलांना ५० टक्के सूट दिली. त्यामुळे एसटी रुळावर येण्यास मदत झाली आहे. २०१९ मध्ये ‘एसटी’च्या उत्पन्न सुमारे सात हजार ६०० कुठे होते. २०२४-२५ मध्ये दहा हजार ५१० उत्पन्न होते, यांची तुलना केली, तर सुमारे दोन हजार ९०८ कोटींची उत्पन्नात वाढ झाली आहे. तरी एसटी तोट्यात कशी, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

८०० नवीन बस येणार आहेत, यासाठी सरकारचे अभिनंदन करतो. सरकारने कर्मचाऱ्यांच्या वेतनात सहा हजार ५०० रुपये केलेली वाढ आतापर्यंतची सर्वांत मोठी वाढ असल्याचेही त्यांनी सांगितले. सरकारच्या सकारात्मक धोरणामुळे आत्महत्येचे प्रमाण घटले आहे. यापूर्वी १२४ जणांनी आत्महत्या केली आहे, असे सांगत त्यांनी सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘एसटी’लाही त्याचप्रमाणे आठव्या वेतन आयोगाच्या बरोबरीने वेतन मिळावे, अशी मागणी त्यांनी केली.

वेळ पडल्यास रस्त्यावर उतरणार

कर्मचाऱ्यांच्या नेहमी पाठीशी आहोत, मागण्यांबाबत सरकारही सकारात्मक आहे. असे असले तरी कर्मचाऱ्यांना आवश्यकता भासल्यास रस्त्यावरही उतरू, नेहमी त्यांच्या पाठीशी आहोत, असे आमदार तथा संघटनेचे कार्याध्यक्षसदाभाऊ खोत यांनी सांगितले. खोटे गुन्हे करून कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे काम यापूर्वी झाले आहे. आम्ही तसे पाप करणार नाही, दोन वर्षे झाले, आम्ही काय काम केले, असे विरोधकांकडून विचारले जाते. तुमचे सरकार होते, त्या वेळी तुम्ही काय केले. असा प्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला. एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. सन्मानाने जगता यावे, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही आलो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वेळ पाडल्यास रस्त्यावरही उतरणार असे त्यांनी सांगितले.

Trimbakeshwar Temple : श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर सज्ज; दर्शनासाठी विशेष व्यवस्था

सरकार सकारात्मक आहे : महाजन

महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. दोन ते चार दिवसांत मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन मागण्या मांडण्यात येणार आहेत. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशीही याबाबत चर्चा झाली आहे. सर्वच देणे शक्य नाही. परंतु जितके देता येईल, तितकेच बोलणार आहे. मुख्यमंत्र्याशीही बोलणे झाले असल्याचेही जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि प्रश्न मार्गी काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.