तुम्हाला माहितीय का? कोणता वाहतूक नियम मोडल्यावर किती दंड लागतो, पहिल्यांदा झालेला दंड न भरल्यास पुढच्यावेळी लागतो दुप्पट दंड, वाचा...
esakal July 29, 2025 04:45 PM

तात्या लांडगे

सोलापूर : मद्यपान करून शहरात विनाकारण रात्रीच्यावेळी वाहनांवरून हुल्लडबाजी करणाऱ्या बेशिस्तांवर कारवाई करण्याच्या हेतूने आठड्यातील तीन दिवस शहरातील प्रमुख पाच चौकांमध्ये पोलिसांची नाकाबंदी असणार आहे. याशिवाय शहरातील सात पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरआठवड्यात तीन दिवस अधिकाऱ्यांसह अंमलदारांची पायी गस्त असणार आहे. त्यावेळी बेशिस्त वाहनधारकांवर कारवााई केली जाणार आहे.

सोलापूर शहरातील मधला मारूती, विजापूर रोड, ७० फूट रोड, सात रस्ता, कन्ना चौक, नई जिंदगी, छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आठवड्यातील कोणत्याही तीन दिवशी अचानक नाकाबंदी केली जाणार आहे. त्यावेळी वाहतूक पोलिस अधिकारी, अंमलदार आणि स्थानिक पोलिस व मुख्यालयाचे अंमलदार, असे एकूण दोन अधिकारी व २० अंमलदार एका नाकाबंदीच्या ठिकाणी असतात.

मद्यपान करून वाहन चालविणे, विनाकारण हुल्लडबाजी करत घराबाहेर फिरणे अशा वाहनधारकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाते. तसेच पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांचाही, चोरीच्या दुचाकींचाही यावेळी शोध घेतला जाणार आहे. नाकाबंदीच्या ठिकाणी अचानकपणे कधीही पोलिस आयुक्त एम. राजकुमार किंवा अन्य पोलिस उपायुक्त भेट देऊन पाहणी करतील, असे नियोजन करण्यात आले आहे. १ जुलैपासून त्यानुसार काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.

बेशिस्त वाहनधारकांना दंड असा...

  • हेल्मेट नाही : १,००० रुपये

  • नो-पार्किंग झोनमध्ये वाहन : सुरवातीला ५०० रुपये, त्यानंतर १५०० रुपये

  • इन्शुरन्स नाही : सुरवातीला २,००० रुपये, त्यानंतर ४,००० रुपये

  • मद्यपान करून गाडी चालवणे : १०,००० रुपये

  • विरूद्ध दिशेने वाहन चालविणे : पहिल्यांदा ५०० आणि नंतर १५०० रुपये

  • नो-एंट्री झोनमधून गाडी चालवणे : २,२५० रुपये (१५०० व ७५० रुपये)

  • मोबाईल टॉकिंग : सुरवातीला १,००० रुपये, त्यानंतर १० हजार रुपये

  • पीयूसी नाही : ५०० रुपये

  • लायसन्स स्वत:जवळ नाही : सुरवातीला ५०० ते १५०० रुपये

  • लायसन्स काढलेलेच नसल्यास : ५००० रुपये

  • सायलेन्सर, ट्रिपल सीट : प्रत्येकवेळी १,००० रुपये

  • डस्ट वाहतूक करताना न झाकल्यास : पहिल्यांदा २,००० नंतर ५,००० रुपये

  • विनापरमीट माल किंवा प्रवासी वाहतूक : १०,००० रुपये

बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

शहरातील शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी, गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण, अशा अनुषंगाने आता प्रत्येक आठवड्यातील तीन दिवस प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पायी गस्त आणि तीन दिवस नाकाबंदी राहील. त्यावेळी वाहतूक पोलिस अंमलदार मद्यपी तथा बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करतील.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.