कृषीमंत्री माणिकराव कोकाटे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात तासाभरापासून चर्चा सुरू आहे. मंत्रालयातील अजितदादांच्या अँटी-चेंबरमध्ये एका तासांपासून खलबंत सुरु आहेत. दादांनी या बैठकीत कोकाटेंसमोरच नाराजी व्यक्त केली. . कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे. असे अजित पवारांनी सुनावले. आता माझ्या हातात काहीच नाही. किती वेळा तुम्हाला वाचवायचं, किती वेळा माफ करायचं असा सवाल अजितदादांनी केला.
बोलताना भान ठेवा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात प्री कॅबिनेट बैठक एक तासापासून सुरू आहे. मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी ही बैठक सुरू आहे. बोलताना सगळ्या मंत्र्यांनी भान ठेवावं. आपल्या एक वक्तव्यामुळे संपूर्ण सरकार अडचणीत येत आहे. माध्यमांशी बोलताना भान ठेवावं, अशा सूचना अजित पवार यांनी सर्व मंत्र्यांना केल्या. दादांनी नाराजी व्यक्त करत कोकाटेंचे कान टोचले.
तरच मंत्र्यांवर कारवाई
शिवसेनेच्या मंत्र्यांवर कारवाई झाली तरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांवर कारवाई होणार असे अजितदादांनी स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे कोकाटेंच्या राजीनाम्याविषयी काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोकाटेंना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही असे समोर येत आहे.
कोकाटे यांच्यावर कारवाई नको तर त्यांना समज देऊयात. कोकाटे यांचे काम चांगले आहे, त्यांना संधी देऊयात असे मत सर्व मंत्र्यांनी अजित पवार यांच्याकडे मांडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान कोकाटे आणि अजितदादा यांच्यातील बैठक संपली असून ते मीडियाशी न बोलता मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी निघून गेले.
कृषीमंत्री वादात अडकले
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्यांमुळे अडचणीत सापडले आहेत. कृषी मंत्री पद हे ओसाड गावची पाटलकी असल्याचे ते म्हणाले. तर यापूर्वी ढेकळांचा विमा द्यायचा का अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यापूर्वी पण त्यांचे एक विधान चर्चेत आले होते. तर पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत ते रमी खेळत असल्याचे समोर आले होते. त्यांनी रमी खेळत नसल्याचे स्पष्ट केले होते. पण त्यावरून राज्यात विरोधक संतापले होते.