बीसीसीआयच्या ऑफिसमध्ये चोरी, लाखो रुपयांचं सामान लंपास! कोणी केलं असं ते जाणून घ्या
GH News July 29, 2025 10:10 PM

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय हे जगातील सर्वात श्रीमंत बोर्डपैकी एक आहे. बीसीसीआयचं कार्यालय मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आहे. या कार्यालयात चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या चोरीच्या घटनेत लाखो रुपयांचं सामन चोरीला गेल्याने खळबळ उडाली. या चोरीच्या घटनेने प्रत्येक जण आश्चर्यचकीत झाला. कारण इतकी सुरक्षा असूनही चोरीची घटना कशी काय झाली? असा प्रश्न समोर आला. पण या चोरीच्या घटनेमागे असलेल्या मास्टरमाईंडचा माहिती मिळताच कार्यालयातील प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ऑफिसमधून आयपीएल जर्सींची चोरी झाली. या जर्सीची किंमत 6.5 लाख रुपये होती. यामुळे प्रत्येक जण असं कसं झालं याचा शोध घेत होता. बीसीसीआयच्या कार्यालयात चोरी करण्यामागे कोणाचा हात आहे?

रिपोर्टनुसार, या चोरीच्या घटनेमागे दुसरं तिसरं कोणी नसून सुरक्षारक्षक असल्याचं समोर आलं आहे. सुरक्षारक्षक फारुक असलम खानने 261 जर्सीची चोरी केली होती. एका जर्सीची किंमत 2500 रुपये आहे. या प्रकरणी फारुकला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर फारुक असलम खानने पोलिसांना सांगितलं की, ही चोरी नेमकी का केली? पोलिसांनी सांगितलं की, ऑनलाईन जुगाराचं व्यसन पूर्ण करण्यासाठी त्याने जर्सी चोरल्या होत्या. यात एकाच संघाच्या नाही तर वेगवेगळ्या संघाच्या जर्सी होत्या. चोरी केलेल्या जर्सी त्याने हरियाणातील एका ऑनलाईन डीलरला विकल्या असल्याचं समोर आलं आहे.

या जर्सी खेळाडूंच्या आहेत की लोकांसाठी हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 13 जून रोजी जर्सी चोरीला गेल्या होत्या. पण ऑडिटमध्ये स्टोअर रुममध्ये जर्सी नसल्याचं समोर आलं. त्यानंतर बीसीसीआय अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यांना एका बॅगेत जर्सी घेऊन जाणारा गार्ड आढळला. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑनलाईन डीलरला या जर्सी चोरीच्या असल्याचं माहिती नव्हते. चोरीला गेलेल्या 261 जर्सीपैकी 50 जर्सी जप्त केल्या आहेत. दरम्यान फारुकला डीलरकडून पैसे मिळाले होते. पण सर्व पैसे ऑनलाइन जुगारात गमावले. पण असंच घडलं की यामागे कोणी आणखी सूत्रधार आहे, याचा पोलीस तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.