इंदापूर : शेतकरी आत्महत्या करतोय, 90 हजार कोटीची ठेकेदारांची बिले थककेली आहेत त्यामुळे ठेकेदार आत्महत्या करतोय. कंत्राटी पद्धतीने वेगवेगळे विभागात काम करणारे सरकारचे कर्मचारी आहेत त्यांच्या पगारी नाहीत. रोजगार हमीतून ज्या शेतकऱ्यांनी विहिरी काढले आहेत त्यांना मजुरी मिळत नाही.गाजावाजा करून मुख्यमंत्री पानंद योजना राबवली त्या योजनेला पैसा नाही.यामुळे सरकारकडे ज्या जबाबदार असतात त्या पूर्ण होताना दिसत नाहीत असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला.
2011- 12 साली कर्मयोगी आणि इतर साखर कारखान्याच्या वर उसाच्या दरासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या केलेल्या आंदोलनामुळे वेगवेगळ्या आठ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल होते.त्या संदर्भात इंदापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे माजी खासदार राजू शेट्टी, माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आले होते.
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना राजू शेट्टी म्हणाले, सद्या तिन्ही पक्षांवर महाराष्ट्रातील जनता नाराज आहे. महायुतीमध्ये धुसफूस आहे की नाही माहित नाही परंतु तिन्ही आघाड्यांवर तिन्ही पक्षांवर महाराष्ट्रातील जनता नाराज आहे. सरकार शक्तीपीठ मार्ग करण्यावर ठाम आहे पण आम्ही शक्तिपीठ मार्ग होऊच देणार नाही.पहिल्यापासून रेखांकन करण्यापासून आम्ही त्याला विरोध केला आहे. निवडणुका लढवणं हा आमचा मार्ग नाही लोकांना न्याय मिळवून देणं हा आमचा मार्ग असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
तर राजू शेट्टी यांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावरून बोलताना म्हणाले,या माणसाला अजून मंत्रिमंडळात का ठेवलेय हा माझा अजित पवारांना सवाल आहे.समज देऊन देखील त्याच्यावर काही परिणाम होत नाही. त्याने शेतकऱ्यांची वारंवार चेष्टा केली आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा अपमान केला आहे. सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्राचे विधिमंडळ आहे. त्या ठिकाणी हे लोक जर जंगली रमी खेळत असतील तर त्यांना सरकारमध्ये राहण्याचा अधिकारच काय ?माणिकराव कोकाटे यांना तातडीने नारळ दिला पाहिजे.असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
एकेकाळच्या सहकाऱ्यांनी एकमेकांकडे पाहणे टाळले..शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संघटनेच्या माध्यमातून सरकारला जेरीस आणणारी जोडी म्हणून एकेकाळी शेट्टी आणि खोतांच्या जोडीला ओळखलं जायचं. मात्र कालांतराने ही जोडी फुटली खोत एनडीए सोबत गेले तर राजू शेट्टी हे स्वतंत्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आपला लढा देत आहेत.दरम्यान इंदापूर येथील न्यायालयीन कामकाजाच्या निमित्ताने एकत्र आलेले शेट्टी. खोत यांनी वकील खोलीमध्ये एकाच सोप्यावरती बसले मात्र एकमेकांच्या नजरेला नजर देखील लावली नाही. त्यामुळे खोत आणि राजू शेट्टी यांच्यातील असणारा संघर्ष आजही तितकाच ज्वलंत असल्याचे पाहायला मिळालं.
सरकारच्या विरोधात लढण्याची हिंमत त्यांच्यात नाही...
न्यायालयीन कामकाजा निमित्त राजू शेट्टी व सदाभाऊ खोत एकत्र आला आहात यापुढे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पुन्हा एकत्र याल का असा प्रश्न विचारला असता सरकारच्या विरोधात लढण्याची हिंमत त्यांच्यात नाही असं म्हणत राजू शेट्टी यांनी खोतांना टोला लगावला.