ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादलं, केंद्राचं संसदेत उत्तर,पीयूष गोयल म्हणाले…
Marathi July 31, 2025 11:25 PM

नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ आणि दंड लादण्याची घोषणा केली. यानंतर केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी याबाबत संसदेत उत्तर दिलं. ते म्हणाले की अमेरिकेनं भारतावर जे टॅरिफ लादले आहेत त्याचा काय परिणाम होईल हे समजून घेतलं जात आहे. देशाचं हित सुरक्षित करण्यासाठी आणि पुढं जाण्यासाठी जे आवश्यक असेल ती पावलं उचलली जातील, असंही ते म्हणाले.

10 ते 15 टक्क्यांवर चर्चा झालेली

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी “भारत-अमेरिका यांच्यातील व्यापार कराराला अंतिम रुप देण्यासाठी महत्त्वाच्या बैठका झाल्या. आयातीवर 10-15 टक्के टॅरिफची चर्चा झाली होती. दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष चार बैठका पार पडल्या तर अनेकदा डिजीटल माध्यमातून चर्चा झाली, असंही गोयल यांनी सांगितलं. ते म्हणाले, अगोदर टॅरिफ 9 एप्रिलपासून लागू होणार होतं, मात्र 10 एप्रिलला 90 दिवसांसाठी स्थगित करण्यात आलं.त्यानंतर ही मुदत 1 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती.

गोयल म्हणाले की भारत आणि अमेरिका यांच्यातील द्वीपक्षीय व्यापार समझोता यावर मार्च 2025 मध्ये चर्चा सुरु झाली होती. कराराचा पहिला टप्पा ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा होता. दोन्ही देशांमध्ये पहिली बैठक 29 मार्च 2025 ला दिल्लीत झाली होती, त्यावेळी द्वीपक्षीय चर्चा सुरु करण्यासाठी टीओआरला अंतिम रुप देण्याबाबत चर्चा सुरु होत्या.

गोयल म्हणाले दोन्ही देशांमध्ये चार फेऱ्यांमध्ये समोरासमोर बैठका झाल्या. निर्धारित टीओआरनुसार द्वीपक्षीय व्यापार कराराला अंतिम रुप देण्याचं काम करायचं होतं. गोयल म्हणाले केंद्र सरकार सध्याच्या घडामोडींचा काय परिणाम होईल याचं परीक्षण करत आहे. सरकार शेतकरी, श्रमिक, उद्योजक, निर्यातदार, लघू आणि मध्यम उद्योग यासह उद्योग विश्वातील सर्व स्टेक होल्डर्सच्या हितांचं रक्षण करण्यास सर्वोच्च महत्त्व देईल. आम्ही आपल्या राष्ट्रीय हितांना सुरक्षित करण्यास आणि ते पुढं नेण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलेल.

पीयूष गोयल यांनी भारताची अर्थव्यवस्था पाच कमजोर अर्थव्यवस्थांमधून बाहेर पडून गेल्या दशकात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था झाली आहे, असं म्हटलंय. भारत आपल्या सुधारणा आणि शेतकरी, एमएसएमई आणि उद्योजकांच्या कठोर मेहनतीच्या जोरावर पहिल्या पाच अर्थव्यवस्था पोहोचला आहे.  भारत लवकरच जगातील तिसरी अर्थव्यवस्था होईल, असंही ते म्हणाले.  पीयूष गोयल यांनी भारतानं गेल्या 11  वर्षात अनेक देशांसोबत व्यापार करार केल्याची माहिती देखील दिली.

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.