इंगलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या 4 सामन्यांमध्ये भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. मात्र केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळवण्यात येत असलेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी घोर निराश केली. त्यामुळे भारताला पहिल्या डावात 250 पारही पोहचता आलं नाही. भारतासाठी करुण नायर याने सर्वाधिक धावांचं योगदान दिलं. करुणने केलेल्या अर्धशतकामुळे भारताला 200 पार पोहचता आलं. इंग्लंडने भारताला 224 धावांवर गुंडाळलं. भारताला झटपट गुंडाळण्यात गस एटकीन्सन याने प्रमुख भूमिका बजावली. एटकीन्सन याने इंग्लंडसाठी सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. तर इतर गोलंदाजांनी गसला चांगली साथ दिली.
भारताला दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात फक्त 20 धावाच जोडता आल्या. भारताने पहिल्या दिवसापर्यंत 64 षटकांमध्ये 6 विकेट्स गमावून 204 धावा केल्या होत्या. करुण नायर आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी दुसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. या जोडीने सातव्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी केली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशी या जोडीकडून अनेक अपेक्षा होत्या. मात्र या दोघांसह इतरांनी निराशा केली.
करुण आणि सुंदर या दोघांना दुसऱ्या दिवशी फक्त 14 धावाच जोडता आल्या. त्यानंतर भारताने 218 धावांवर करुण नायर याच्या रुपात सातवी विकेट गमावली. करुणने 109 बॉलमध्ये 8 फोरसह 57 रन्स केल्या. त्यानंतर इंग्लंडने भारताला झटपट 3 झटके देत गुंडाळलं. करुणनंतर सुंदर 26 धावांवर बाद झाला. तर मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. प्रसिध आऊट भारताचा डाव 224 धावांवर आटोपला. भारताने अशाप्रकारे अवघ्या 6 धावांच्या मोबदल्यात शेवटचे 4 विकेट्स गमावल्या.