भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावणाऱ्या शार्दुल ठाकुर याच्या खांद्यावर मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी वेस्ट झोन संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवली आहे. झोनल निवड समितीने शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. हा निर्णयानंतर क्रीडाविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. श्रेयस अय्यर संघात असताना शार्दुल ठाकुर का? असा प्रश्न विचारला जात आहे. पण असा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे आशिया कप स्पर्धा… ही स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे आणि श्रेयस अय्यरची भारतीय संघात वर्णी लागू शकते. त्यामुळे त्याच्या ऐवजी शार्दुल ठाकुरकडे नेतृत्व सोपवलं आहे. दुलीप ट्रॉफी स्पर्धा 28 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. श्रेयस अय्यरने दुलीप ट्रॉफी खेळण्यास उपलब्ध असल्याचं सांगितलं होतं. श्रेयस अय्यर भारतासाठी 14 कसोटी खेळला आहे. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
दुसरीकडे, या संघातून अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना डावलण्यात आलं आहे. दोघांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र त्यांना आंतरराष्ट्रीय संघात संधी मिळताना दिसत नाही. चेतेश्वर पुजार 2023 ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये गुजरातविरुद्ध फेब्रुवारी 2025 मध्ये शेवटचा सामना, तर लिस्ट ए मध्ये सिक्किमविरुद्ध 5 डिसेंबर 2023 रोडी शेवटचा सामना खेळला होता. तर अजिंक्य रहाणे वेस्ट इंडिजविरुद्ध 2023 मध्ये शेवटचा सामना, तर मुंबईकडून विदर्भविरुद्ध 2025 शेवटचा सामना खेळला होता.
दरम्यान, शार्दुल ठाकुरच्या नेतृत्वात अनेक दिग्गज खेळाडू मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे वेस्ट झोन संघ तुलनेने अधिक मजबूत वाटत आहे. शार्दुल ठाकुरने मागच्या पर्वात मुंबईला रणजी स्पर्धेत यश मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.
दुलीप ट्रॉफी स्पर्धेसाठी वेस्ट झोन संघ : शार्दुल ठाकुर (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, आर्या देसाई, हार्विक देसाई (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सरफराज खान, ऋतुराज गायकवाड़, जयमीत पटेल, मनन हिंगराजिया, सौरभ नवाले (विकेटकीपर), शम्स मुलानी, तनुष कोटियन, धर्मेंद्र जडेजा, तुषार देशपांडे, अर्जन नागवासवाला.