मंत्री माणिकराव कोकाटे हे विधानभवनात रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांचे खाते बदलले आहे. त्यांच्याकडून कृषी खाते काढू घेतले असून त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दत्तात्रय भरणे यांना कृषिमंत्रीपद देण्यात आले आहे. या खातेबदलानंतर कोकाटे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
खातेबदलानंतर बोलताना मंत्री माणिकराव कोकाटे यांनी, ‘राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे. भरणे हे शेतकरी पुत्र आहेत, त्यांच्याकडे खातं दिल्यामुळे न्याय होईल. दत्तामामा भरणे यांना काही मदत लागली तर मी मदत करणार. मला काही मदत लागली तर त्यांचा सल्ला घेणार.मी अजिबात नाराज नाही’ असं विधान केलं आहे.
कोकाटेंचं खात बदलल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी म्हटलं की, सभागृहात ऑनलाइन गेम खेळणाऱ्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याऐवजी खाते बदलून देणे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अपरिहार्यता दाखवून देणारं आहे. एकीकडे राज्यातील कृषी क्षेत्राचे धिंडवडे निघाले असताना कृषीमंत्री विधानभवनात उघडपणे पत्ते खेळतात, शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधाने करतात, त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी त्यांचे खाते बदलून दिले जाते, हे म्हणजे राज्य सरकारकडून त्यांना गैरवर्तनाच बक्षीस दिल्यासारखेच आहे..
सामन्य कर्मचाऱ्यांनी असं काही केलं असत, तर त्याला निलंबित केलं असतं. परंतु मंत्री असलेल्या व्यक्तीला फक्त विभाग बदलून दिला जातो. मुख्यमंत्री महोदय, हे ताकद टिकवून ठेवायचं आणि जोडीतोडीच राजकारण तर नाही ना? असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.
अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत बोलताना की, जर एखादा चांगला मंत्री असता तर तो एका मिनिटात राजीनामा देऊन मोकळा झाला असता. पण आता माणिकराव कोकाटेंना दुसरं पद दिलं गेलं , याला आपण कारवाई म्हणणार का? असा सवाल उपस्थित केला आहे.