पालघर जिल्ह्याच्या मराठा सेवा संघ समित्या पुनर्गठित
विक्रमगड, ता. ३० (बातमीदार) ः मराठा सेवा संघ केंद्रीय समितीच्या निर्देशानुसार पालघर जिल्हा पुनर्गठन सभा संत रोहिदास सभागृह, विक्रमगड येथे शनिवारी (ता. २६) दुपारी एक वाजता पार पडली. पालघर जिल्ह्यातील मराठा सेवा संघाचे कार्य अधिक प्रभावी घडावे, या उद्देशाने ही सभा आयोजित केली असल्याचे सांगण्यात आले. निरीक्षक दीपक भदाणे (नाशिक), जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, विभागीय अध्यक्ष नितीन मोकाशी, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तेजस भोईर, जिजाऊ ब्रिगेड नाशिक जिल्हाध्यक्ष स्मिता शिंदे, माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ रामनबैनवाड, सुनील अहिरे आदी उपस्थित होते.
नागनाथ रामनबैनवाड यांनी विविध मराठा सेवा संघाच्या उपक्रमांची तर नितीन मोकाशी यांनी संघटना बांधणीबाबत माहिती दिली. माधुरी भदाणे यांनी निवड प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले. ३२ कक्षांच्या सहभागातून सर्वांगीण देशव्यापी बदल करून पुरुषोत्तम खेडेकर यांच्या स्वप्नातला मराठा सेवा संघ तयार करण्यासाठी झोकून कामाला लागावे, असे आवाहन केले.
या पुनर्गठन सभेत मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष म्हणून विक्रमगडचे तहसीलदार मयूर चव्हाण, वाडा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वैभव शिंदे यांची कार्याध्यक्षपदी तर सचिवपदी शिवराज डावळे तसेच पालघर जिल्हा उपाध्यक्ष, तालुकाध्यक्षांची निवड केली. या वेळी ३२ कक्ष स्थापन करताना कृषी कक्ष जिल्हाध्यक्ष अनंता पवार, पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद केशव पवार, सामूहिक विवाह कक्ष जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पठारे, तानुबाई बिर्जे पत्रकार कक्ष जिल्हाध्यक्ष संदीप साळवे, राजर्षी शाहू शिक्षण परिषद जिल्हाध्यक्ष जयश्री पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.