शिक्षकांना ज्यादा तास घ्यावे लागणार! इयत्ता अकरावी प्रवेशाच्या आणखी २ गुणवत्ता याद्या; चौथी मेरिट लिस्ट आज; पाचवी यादी २ ऑगस्टनंतर प्रसिद्ध होणार
esakal July 31, 2025 12:45 PM

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता अकरावीचे प्रवेश ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त झालेली महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, सोलापूर जिल्ह्यातील एकही महाविद्यालय सुरू झालेले नाही. दरम्यान, उद्या (गुरुवारी) प्रवेशाची चौथी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर शिल्लक राहिलेल्या प्रवेश जागांसाठी २ ऑगस्टनंतर पाचवी खुली गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर ११ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांचे वर्ग नियमित सुरू होणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील ५०० हून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांना विज्ञान, कला व वाणिज्य शाखेसाठी ५६ हजार विद्यार्थी अपेक्षित आहेत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अनेक महाविद्यालयांना अपेक्षित प्रवेश मिळालेले नाहीत. कला शाखेची तर दयनीय आवस्था आहे. दरम्यान, २९ जुलैला दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यातही दोन विषयात अनुत्तीर्ण राहिलेल्या विद्यार्थ्यांना ‘एटीकेटी’तून थेट कला शाखेला प्रवेश मिळू शकतो.

मात्र, सप्टेंबरअखेर संचमान्यता होणार असून तत्पूर्वी पटसंख्येअभावी आपण अतिरिक्त होऊ शकतो अशी चिंता शेकडो शिक्षकांना लागली आहे. तरीपण, ३१ जुलै आणि २ किंवा ३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या गुणवत्ता यादीनंतर कोणत्या महाविद्यालयांना किती प्रवेश कमी पडले, हे स्पष्ट होणार आहे.

११ ऑगस्टपासून अकरावीचे वर्ग

यंदा पहिल्यांदाच इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली. पारदर्शकपणे ही प्रक्रिया पार पडल्याने विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा वेळ, पैशाची बचत झाली आहे. आता ३१ जुलै रोजी चौथी गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यानंतर सर्वांसाठी खुली गुणवत्ता यादी २ ऑगस्टनंतर प्रसिद्ध होईल. ११ ऑगस्टपासून अकरावीची सर्व महाविद्यालये सुरू होतील.

- महेश पालकर, संचालक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण

शिक्षकांना घ्यावे लागणार जादा तास

गतवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल मेअखेर जाहीर होऊनही अकरावीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू झाले होते. मात्र, यंदा निकाल लवकर जाहीर होऊनही अकरावीचे प्रवेश अद्याप सुरूच आहेत. ११ ऑगस्टपासून इयत्ता अकरावीची सर्व महाविद्यालये सुरू होतील. पण, गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७ ते २८ दिवस अकरावीचे वर्ग उशिराने सुरू होणार असल्याने या काळातील अभ्यासक्रम शिक्षकांना जादा तास घेऊन पूर्ण करावा लागणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.