Pranjal Khewalkar : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांचा स्वत:च्याच दाव्यावर युटर्न; कारवाईवर प्रश्नचिन्ह
esakal July 31, 2025 08:45 PM

Pranjal Khewalkar: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या दाव्यावर आता युटर्न घेतलाय. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुषांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीय. तर दोन तरुणींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय. प्रांजल यांच्या वकिलांकडून पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. यातच आता पोलिसांनी केलेल्या दाव्यांमधला फोलपणा उघड झालाय. पोलिसांनी स्वत:च्याच दाव्यावर युटर्न घेतला आहे.

पोलिसांनी सुरुवातीला रेव्ह पार्टी प्रकरणी छापा टाकलेल्या हॉटेल परिसरात तीन तरुणी संशयास्पदरित्या दिसल्याचं म्हटलं होतं. आता पोलिसांनी त्या तिघींचा पार्टीशी काहीच संबंध नसल्याचं म्हटलंय. पोलिसांनी दिलेल्या या माहितीमुळे कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे पोलिसांनी रविवारी पहाटे खराडीत छापा टाकत कारवाई केली होती. यात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक केलीय. यात कोकेनसदृश्य पदार्थ, ७० ग्रॅम गांजाही जप्त केला गेला. तसंच या हॉटेलमध्ये पार्टीसाठी बूकिंग प्रांजल खेवलकर यांच्या नावाने करण्यात आलं होतं.

Pune Porsche Crash Case : आईच्या शस्त्रक्रियेसाठी विशाल अग्रवालचा तात्पुरत्या जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

खराडीत हॉटेलवर छाप्यानंतर पोलिसांनी सांगितलं होतं की, हॉटेल परिसरात आणखी तीन तरुणी दिसून आल्या होत्या. कारवाई सुरू असल्यानं त्या बाहेरच्या बाहेरच निघून गेल्या. त्यांचा शोध घेत आहोत असं पोलिसांनी न्यायालयात म्हटलं होतं. पण प्रत्यक्षात त्या तिघींचा पार्टीशी संबंध नसल्याचं आता स्पष्ट करण्यात आलंय. अद्याप पोलिसांना पार्टीत ड्रग्ज पुरवणाऱ्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे तपासावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रांजल यांच्या कुटुंबियांकडून पोलिस तपास आणि कारवाईवर संशय व्यक्त करण्यात आलाय. पोलिसांनी केलेली कारवाई बनावट आहे. पोलिसांनीच तरुणीला कोकेनसह पार्टीत घुसवलं होतं असा आरोप केला जात आहे. कारवाई करत असतानाचे फोटो व्हिडीओ व्हायरल करून बदनामी केली गेली, याविरोधात उच्च न्यायालयात पोलिसांविरोधात ५० कोटींचा दावा ठोकणार असल्याचंही खेवलकर यांच्यासह आरोपींच्या वकिलांनी सांगितलं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.