Manikrao Kokate : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत होते. पावसाळी अधिवेशन चालू असताना ते सभागृहात ऑनलाईन रमी गेम खेळताना आढळले होते. ते गेम खेळताचा व्हिडीओही सगळीकडे व्हायरल झाला होता. दरम्यान, हा कोकाटेंच्या या कृतीमुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सरकारवर मोठा दबाव वाढला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषिखातं काढून घेतलं जाणार आहे.
नेमका निर्णय काय घेतला जणार?गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली जात होती. त्यासाठी राज्यभर आंदोलनेही झाली. विरोधकांचा आणि जनतेचा पवित्रा लक्षात घेता आता मोठा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. लवकरच माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखाते काढून घेतले जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे. त्यांच्या खात्याचा कारभार अन्य नेत्याकडे सोपवला जाणार आहे, अशी माहिती मिळत आहे.
कोकाटेंना अन्य खात्याची जबाबदारी?नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात बैठक झाली आहे. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. कोकाटे यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांच्यावर अन्य खात्याची जबाबदारी सोपवली जाईल, असे सांगितले जात आहे.
कोकाटे यांना कोणती नवी जबाबदारी मिळणार?आज संध्याकाळपर्यंत याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्षाचेच दत्ता भरणे आणि मकरंद पाटील या दोन्ही मंत्र्यांकडे असलेली खाती ही माणिकराव कोकाटे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. तर कोकाटे यांना दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील या दोन मंत्र्यांच्या खात्यांपैकी एक खाते दिले जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
विरोधक काय भूमिका घेणार?दरम्यान, कोकाटे यांचा राजीनामा न घेता त्यांचे खातेबदल केले जाऊ शकते. त्यामुळे आता विरोधक नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.