पिंपरी : निगडी प्राधिकरण परिसरातील बंगल्यात शिरून ज्येष्ठ नागरिकाचे हातपाय बांधून आणि पिस्तुलाचा धाक दाखवत दरोडा टाकणाऱ्या टोळीतील दोघांना पकडण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाला यश आले. राजस्थानपर्यंत बाराशे किलोमीटर माग काढून पोलिसांनी मुख्य सूत्रधाराला अटक केली; तर एका आरोपीला वडगाव मावळ येथून ताब्यात घेण्यात आले. मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आरोपींनी मोबाईलऐवजी वॉकी टॉकीचा वापर केल्याचे समोर आले.
सुरेश लादुराम ढाका (वय २९, रा. दंतिवास, ता. भिनमाल, जि. जलौर, राजस्थान) व महिपाल रामलाल बिष्णोई (वय १९, रा. वडगाव फाटा चौक, वडगाव मावळ, पुणे, मूळ - जौधपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी विविध पथके तयार करण्यात आली. मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक विजय ढमाळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सुमारे बाराशे किलोमीटर प्रवास केला.
तसेच २०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यामध्ये राजस्थान येथील जयपूरमधून सुरेश ढाका याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटार, चार वॉकी टॉकी, दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, वाहनाचे आरसी बुक असा मोठा मुद्देमाल जप्त केला. सखोल चौकशी करुन महिपाल रामलाल विष्णोई यालाही तळेगावातून अटक केली.
काय प्रकार घडला होता?निगडी प्राधिकरणातील एका बंगल्यात १९ जुलैला पाच जणांनी दरोडा घातला होता. त्यांनी बंगल्यातील एका ज्येष्ठ नागरिक तसेच घराची देखभाल करणाऱ्या दांपत्यासह त्यांच्या दोन मुलांनाही पिस्तुलाचा धाक दाखवून घरात कोंडून ठेवले. त्यानंतर बंगल्यातील कपाटे उचकटून सहा लाख १५ हजारांचा ऐवज लंपास केला.