Table Tennis: आशियाई स्पर्धेतील दमदार कामगिरीनंतर भारताच्या पुरुष व महिला टेबल टेनिस संघांना २०२६ च्या जागतिक स्पर्धेसाठी प्रवेश
esakal August 02, 2025 01:45 PM

नवी दिल्ली : भारताच्या दोन्ही संघांनी (पुरुष व महिला) दक्षिण आशियाई विभागीय अजिंक्यपद स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. याच कामगिरीच्या जोरावर भारताच्या दोन्ही संघांना २०२६ मध्ये लंडन येथे होत असलेल्या जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवता आली.

जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मध्य आशिया, दक्षिण आशिया, दक्षिण पूर्व आशियाई आणि पश्चिम आशिया या चार स्पर्धांमध्ये संस्मरणीय कामगिरी केल्यानंतर जागतिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवता येते. भारताच्या दोन्ही संघांनी दक्षिण आशियाई विभागीय अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल दर्जाची कामगिरी करीत प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्थान मिळवले.

पुरुषांच्या विभागात निर्भेळ यश

भारताच्या पुरुषांच्या संघात आकाश पाल, रोनित भांजा, अर्निबन घोष, पी. बी. अभिनंद आणि दिव्यांश श्रीवास्तव या खेळाडूंचा समावेश होता. भारताचा गट एक यामध्ये समावेश होता.भारतासह या गटामध्ये बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ व मालदीव या देशांचा समावेश होता. भारताच्या पुरुष संघाने चारही देशांना ३-० असे पराभूत करीत आठ गुणांसह या गटामध्ये पहिले स्थान मिळवले.

महिलांच्या विभागातही बाजी

भारताचा महिला संघही गट एकमध्ये होता. या गटातही भारतासमोर बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ व मालदीव याच चार देशांचे आव्हान होते. भारताच्या महिला संघामध्ये या स्पर्धेत क्रितविका सिन्हा, सेलेनादीप्ती सेल्वाकुमार, तनीषा कोटेचा, सायली वाणी व सिंड्रेला दास या खेळाडूंचा समावेश होता.

Khalid Jamil: मुंबईचे खालिद जमील प्रशिक्षकपदी; भारतीय फुटबॉल संघाला मार्गदर्शन करणार

भारताच्या महिला संघाने पुरुषांप्रमाणेही घवघवीत यश मिळवले. महिला संघानेही चारही देशांना ३-० अशा फरकानेच पराभूत केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.