मोबाईलऐवजी वापरला वॉकी टॉकी, दरोड्यासाठी चोरट्यांची अनोखी शक्कल ! अखेर..
Tv9 Marathi August 02, 2025 04:45 PM

राज्यातील गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालल्या आहेत. त्यातच आता विद्येचे माहेरघर म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या पिंपरी-चिंचडवमध्येही एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पिंपरी चिंचवड शहरामधील प्रतिष्ठित आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या निगडी प्राधिकरण परिसरात एका उद्योजकाच्या घरात घुसून त्याचे हातपाय बांधून पिस्तूलाचा धाक दाखवत तब्बल 6.15 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला. मात्र या लुटेरू टोळीचा 1200 किमी पाठलाग करत त्यांच्या मुसक्या आवळण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश मिळालं आहे.

चक्क राजस्थानपर्यंत जाऊन पोलिसांनी या गुन्हेगारांना पकडलं. तर दरोड्यात सहभागी असलेल्या स्थानिक आरोपीला तळेगावहून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

चोरीसाठी अनोखी शक्कल, मोबाईलऐवजी वापरला वॉकी-टॉकी

विशेष म्हणजे चोरांच्या या टोळीने चांगलीच युक्ती लढवली. मोबाईल लोकेशन ट्रेस होऊ नये म्हणून आरोपींनी मोबाईलऐवजी वॉकी टॉकीचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरण मध्ये 19 जुलै रोजी एका उद्योजकाच्या बंगल्यात या टोळीने प्रवेश केला. त्यानंतर त्या इसमाच्या तोंडावर चिकटपट्टी लावली, त्यांचे हातपाय बांधले आणि त्यानंतर घरातील कपाटे उचकून 6 लाख 15 हजारांचा ऐवज लंपास केरत ते फरार झाले. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळ, रोख रक्कम असा ऐवज लंपास केला होता.

1200 किमी प्रवास करत चोरांना पकडण्यात पोलिसांना यश

या चोरीची तक्रार नोंदवल्यानंतर तपासासाठी बनवण्यात आलेल्या पथकान सुमारे 1200 किलोमीटर प्रवास करत, आणि 200 सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आरोपींना जेरबंद केलं.जयपूरमधून सुरेश ढाका आणि त्याचा साथीदार यांना शामनगर, जयपूर मधून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार,चार वॉकी टॉकी, दोन मोबाईल, सोन्याचे दागिने, फिर्यादीचे पाकीट, आधार कार्ड, गाडीचे आरसी बुक असा मोठा मुद्देमाल जप्त केला.

तर या गुन्ह्यात सहभागी असलेल्या हिपाल विष्णोई याला तळेगाव मधून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून फिर्यादीच्या पत्नीच्या सोन्याच्या बांगड्या, कानातले, घड्याळ आणि बनावट नंबर प्लेट जप्त करण्यात आली. राजस्थान आणि गुजरात राज्यांत या आरोपींवर खूनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आदी २१ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. या टोळीत एक महिला आरोपी आणि इतर तीन आरोपींचा तपास सुरू असून लवकरच त्यांना अटक होण्याची शक्यता आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.