एकनाथ खडसे यांच्या जावयाला रेव्ह पार्टी करताना रंगेहात पकडल्यानंतर राजकीय वर्तुळात भूकंल आला. पुण्यातील खराडी भागात ही रेव्ह पार्टी सुरू होती आणि पोलिसांनी छापेमारी करत प्रांजल खेवलकरसोबतच इतर सात जणांना अटक केली. या पार्टीतून कोकेन, गांजा आणि मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आली. खेवलकर हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जामिनासाठी अर्ज करण्याची दाट शक्यता आहे. त्यापूर्वीच रोहिणी खडसे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतलीये.
शरद पवारांच्या भेटीनंतर रोहिणी खडसे यांनी माध्यमांसोबत संवाद साधलाय. रोहिणी खडले यांनी म्हटले की, या सर्व प्रकरणात मी योग्यवेळी उत्तर देणार आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मी माझ्या पतीला भेटण्यासाठी सीपी कार्यालयात गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते. मला कोर्टात दुसऱ्या दिवशी हजर व्हायचे होते आणि मला त्यांच्याकडून काही माहिती हवी असल्याने मी गेले होते. त्यावेळीच कार्यालयात सीपी साहेब असल्याने मी त्यांची देखील भेट घेतली.
रूपाली चाकणकरांच्या टिकेवर बोलताना रोहिणी खडसे यांनी म्हटले की, करू द्या मग काय झालं…मी योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार आहे. पोलिसांनी सांगितले की, पाळत ठेवणे हा आमचा हेतू नव्हता. त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन हे सांगितलं. तुम्ही मला त्या केस संदर्भात न्यायालयात जी चर्चा झाली ते मला विचारू नका. विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट केले जातं, असं म्हणायला जागा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पती प्रांजल खेवलकरला अटक झाल्यानंतर तब्बल 24 तास रोहिणी खडसे यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया ही दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सत्य लवकरट बाहेर येईल, असे म्हणत पतीच्या फोटोसह पोस्ट शेअर केली. आता प्रांजल खेवलकरला जामीन कधी मिळतो, हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. कोर्टातील सुनावणीवेळी देखील रोहिणी खडसे कोर्टात उपस्थित होत्या.