रक्षाबंधन हा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचा आणि नात्याचा उत्सव! या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून प्रेम व्यक्त करतात आणि भाऊ तिच्या संरक्षणाचं वचन देतो. हा दिवस फक्त राखी आणि भेटवस्तूंपुरता मर्यादित नसतो, तर त्यात भावनांचा आणि गोड आठवणींचा गोडवा असतो.
या रक्षाबंधनाला बाजारातून मिठाई विकत घेण्याऐवजी, तुम्ही स्वतःच्या हाताने काहीतरी खास बनवून तुमच्या भावाला एक गोड सरप्राईज का देऊ नये? आम्ही तुमच्यासाठी अशीच एक सोपी आणि चविष्ट रेसिपी घेऊन आलो आहोत ‘नारळ मिल्क बर्फी’. ही बर्फी बनवण्यासाठी तुम्हाला गॅस पेटवण्याचीही गरज नाही आणि फक्त 10 – 15 मिनिटांत ती तयार होते. चला, तर मग जाणून घेऊया ही खास बर्फी कशी बनवायची
मिल्क पावडर : 1 कप
नारळाचा कीस (पावडर) : 1 कप
कंडेन्स्ड मिल्क : 1/2 कप
दूध : 2 ते 3 चमचे (गरजेनुसार)
तूप : 1 ते 2 चमचे
ड्राय फ्रूट्स : (बारीक कापलेले)
फूड कलर : काही थेंब (ऐच्छिक)
1. सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात मिल्क पावडर, नारळाचा कीस, कंडेन्स्ड मिल्क आणि तूप एकत्र घ्या.
2. आता थोडे-थोडे दूध घालून हे मिश्रण मळून घ्या. हे पीठ मऊसर असावे.
3. मळून झाल्यावर हे मिश्रण झाकून 5 मिनिटांसाठी ठेवा, जेणेकरून ते सेट होईल.
4. आता या तयार मिश्रणाचे दोन भाग करा, एक भाग थोडा मोठा आणि दुसरा लहान ठेवा.
5. लहान भागामध्ये तुम्हाला आवडेल तो फूड कलर घाला. या रंगाच्या मिश्रणाचा एक रोल (दंडगोलाकार) तयार करा. त्याच्या आतमध्ये बारीक कापलेले ड्राय फ्रूट्स भरा आणि रोल नीट बंद करा.
6. आता मोठ्या भागाला पोळीसारखं लाटून घ्या. त्या लाटलेल्या भागावर रंगाचा ड्राय फ्रूट्स भरलेला रोल ठेवा आणि त्याला गुंडाळून पुन्हा एक मोठा रोल तयार करा.
7. एका धारदार सुरीने या रोलचे तुमच्या आवडीनुसार छोटे-छोटे तुकडे (बर्फीच्या आकाराचे) कापा.
8. तुमची बर्फी तयार आहे! तुम्ही वरून थोडे ड्राय फ्रूट्स किंवा चांदीचा वर्क लावून तिला सजवू शकता.
1. जर तुमच्याकडे कंडेन्स्ड मिल्क नसेल, तर तुम्ही दूध आणि साखर एकत्र करून एक घट्ट मिश्रण तयार करून ते वापरू शकता.
2. जर तुम्हाला रंगीत बर्फी बनवायची नसेल, तर तुम्ही फूड कलर वगळून साधी पांढरी बर्फीही बनवू शकता.
3. ही बर्फी फ्रिजमध्ये ठेवून 2 ते 3 दिवस सहज वापरता येते.