Meghna Bordikar: 'महायुतीच्या नेत्यांचा वाचाळपणा सुरूच'; कोकाटे यांच्यानंतर मेघना बोर्डीकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
esakal August 04, 2025 09:45 AM

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना तंबी दिल्यानंतरसुद्धा महायुतीमधील मंत्र्यांकडून वादग्रस्त विधाने करणे सुरूच आहे. रमी खेळल्याच्या वादावरुन कृषिमंत्री पदावरून माणिकराव कोकाटे यांची नुकतीच उचलबांगडी करण्यात आली. आता परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका सभेमध्ये ग्रामसेवकालाच कानाखाली मारण्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला आहे. बोर्डीकर यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत जाब विचारला आहे.

Solapur: 'दोन वर्षांपूर्वी मिळाली नोकरी, नाही आवरला लाचेचा मोह'; साहेबांच्या नावे रिक्षावाल्यामार्फत घेतले नऊ हजार

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मेघना बोर्डीकर यांनी एका कार्यक्रमामध्ये ग्रामसेवकाला दमदाटी करत ‘कानाखाली मारेन’ असे म्हटल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. ‘‘असे कुणाचे काम केले ना तर याद राख, कानाखाली मारेन. पगार कोण देते? आत्ताच्या आता बडतर्फ करेन. चमचेगिरी कोणाची करायची नाही, याद राख. तू काय कारभार करतो हे मला माहीत नाही का? मी मुद्दाम सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे. हमाली करायची ना, तर सोडून दे नोकरी,’’ अशा शब्दांत बोर्डीकर या ग्रामसेवकाला व्यासपीठावरूनच दमदाटी करत असल्याचेही त्यात दिसत आहे.

हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकताना रोहित पवार यांनी टीका केली आहे. ‘‘सभागृहात रमी खेळणारे, पैशांच्या बॅगा भरणारे, डान्सबार चालवणारे, आधी वाकडे काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे. यामध्ये भर पडली ती आता अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची. सरकारी कार्यक्रमाला घरकुलाच्या लाभार्थींना आणण्याचे टार्गेट पूर्ण केले नाही म्हणून भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात? फडणवीस साहेब, काय सज्जन मंत्री शोधलेत आपण! तुमच्या मंत्रिमंडळाची तर इज्जत जातेच, पण यापेक्षाही महाराष्ट्राची बेअब्रू होतेय, याची जास्त चिंता आहे. कृपया यांना आवरा,’’ असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

व्हिडिओ अर्धवट : बोर्डीकर

रोहित पवार यांनी अर्धवट व्हिडिओ टाकून जनतेची दिशाभूल केली असल्याचा दावा आमदार मेघना बोर्डीकर यांनी केला आहे. ‘‘संबंधित ग्रामसेवक विधवा महिलांना पैसे मागून त्यांना ग्रामपंचातींमध्ये लुडबुड करणाऱ्या एका नेत्याकडे पाठवून त्यांचा छळ करीत होता. मग त्याची पूजा करायची का? अशा लोकांमुळे सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचत नसतील तर काय उपयोग? हा माझा त्रागा होता. ‘आमदाराशी नीट वाग, नाहीतर कानाखाली वाजवेन’ असे पोलिस अधिकाऱ्याला धमकावणाऱ्या रोहित पवारांनी आम्हाला शिकवू नये,’’ असे बोर्डीकर यांनी यासंबंधी खुलासा करताना म्हटले आहे.

माेठी बातमी! 'गुंठ्यांची खरेदी विहीर, घर, रस्त्यासाठीच परवानगी मिळणार'; शासनाच्या नव्या नियमावलीची लागली प्रतीक्षा ‘गुंडांमध्ये हिंमत येते कोठून?’

महादेव मुंडे प्रकरणातील मुख्य आरोपी गोट्या गीते याने आत्महत्या करण्याचा इशारा देणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर टाकत या आत्महत्येला जितेंद्र आव्हाड यांना जबाबदार धरण्यात यावे, असे म्हटले आहे. त्यावर रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना याबाबत जाब विचारला आहे. ‘‘मकोकाचा फरार आरोपी गोट्या गीते ८-९ मिनिटांचा व्हिडिओ काढून आव्हाड यांना धमक्या देतो, एवढी हिंमत या गुंडांमध्ये येते कुठून? आपला गृहविभाग काय करतोय? गृहमंत्री साहेब उत्तर द्या,’’ असे रोहित पवार यांनी विचारले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.