11th Class Admission : राज्यातील २१ लाखांहून अधिक अकरावीच्या जागांपैकी ८.८२ लाख प्रवेश निश्चित; खुल्या फेरीकरिता आजच भरा अर्ज
esakal August 05, 2025 09:45 PM

पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी चार नियमित फेऱ्यांनंतर आता सर्वांसाठी खुली फेरी राबविण्यात येत आहे. या फेरीत विद्यार्थ्यांना मंगळवारपर्यंत (ता. ५) महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम आणि अर्जाचा भाग एकमध्ये दुरुस्ती करता येणार आहे.

या फेरीची गुणवत्ता यादी आणि विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमानुसार मिळालेले महाविद्यालय बुधवारी (ता. ६) सकाळी दहा वाजता जाहीर होणार आहे. राज्यात एकूण चौथ्या फेरीपर्यंत नऊ हजार ५२२ कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी ऑनलाइन संकेतस्थळावर केली आहे.

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी एकूण २१ लाख ५० हजार ४७९ जागा उपलब्ध आहेत. या जागांवरील प्रवेशासाठी १४ लाख ३८ हजार ८९४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. प्रवेशाच्या नियमित चार फेऱ्या शनिवारी पूर्ण झाल्या आहेत. या फेऱ्यांमध्ये एकूण आठ लाख ८२ हजार ८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. चौथ्या फेरीअखेरपर्यंत एकूण १२ लाख ६८ हजार ३९८ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.

‘सर्वांसाठी खुली’ फेरीत विद्यार्थ्यांना मंगळवारी सायंकाळी साडेसहापर्यंत महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम आणि अर्जाच्या भाग एकमध्ये दुरुस्ती करता येणार आहे. तसेच, नवीन विद्यार्थ्यांना नोंदणीदेखील करता येणार आहे.

पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्रवेश फेरीमध्ये नोंदणी करू शकतात. अकरावीच्या प्रवेशाकरिता प्राधान्यक्रम नोंदवू शकतात. आतापर्यंत झालेल्या चार फेऱ्यांमध्ये प्रवेश न मिळालेले विद्यार्थी या प्रवेश फेरीत त्यांच्या अर्जाचा भाग एक आणि भाग दोन यामध्ये त्यांच्या आवशक्यतेनुसार बदल आणि दुरुस्ती करू शकतात.

MPSC eKYC : ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पुन्हा लांबणीवर; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निर्णयामुळे विद्यार्थी संभ्रमात

वैशिष्ट्ये काय?

  • माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलैमध्ये घेतलेल्या पुरवणी परीक्षेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार

  • यापूर्वी अपूर्ण अर्जाचा भाग एक आणि दोन असल्यास अशा विद्यार्थ्यांना अर्ज पूर्ण भरता येईल

  • अर्जाचा भाग एक आणि दोनमध्ये आणि प्राधान्यक्रम आवश्यकतेनुसार बदल करता येतील

  • नोंदणी न झालेल्या विद्यार्थ्यांना नव्याने नोंदणी आणि प्राधान्यक्रम शक्य

  • यापूर्वी अर्जाचा भाग एक-दोनमध्ये आवश्यकतेनुसार बदल किंवा दुरुस्ती करणे शक्य

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.