पहलगम दहशतवादी पाकिस्तानी आहेत
Marathi August 06, 2025 12:25 PM

भारताकडून सहा बिनतोड अणि सज्जड पुरावे

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताच्या सेनेने जम्मू-काश्मीरमध्ये 28 जुलैला पार पाडलेल्या ‘महादेव अभियाना’त मारले गेलेले तीन दहशतवादी पाकिस्तानीच होते आणि त्यांनीच 22 एप्रिल 2015 या दिवशी पहलगाम येथे धर्म विचारुन निरपराध पर्यटकांची नृशंस हत्या केली होती, हे दर्शविणारे बिनतोड आणि सज्जड पुरावे भारताने सादर केले आहेत. हे दहशतवादी भारतीय नव्हते, ही बाब निर्विवादपणे सिद्ध होत आहे.

पहलगाम हल्ला केलेले दहशतवादी पाकिस्तानचे कशावरुन, असा प्रश्न काँग्रेसच्या काही नेत्यांनी विचारला होता. माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी हे दहशतवादी स्थानिक होते, असाही दावा एका कार्यक्रमात केला होता. संसदेत पहलगाम हल्ला आणि ‘सिंदूर अभियाना’संदर्भात जी चर्चा झाली, तिच्या आधी एक दिवस या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, विशेषत: काँग्रेसकडून या शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या.

सर्व शंकांना उत्तरे

भारताच्या गुप्तहेर संस्था आणि स्थानिक पोलिस यांनी या संदर्भात भक्कम पुरावे सादर केले आहेत. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडलेल्या गन्स, त्यांची मतदार कार्डे आणि त्यांच्याकडे सापडलेल्या इतर साधनसामग्रीवरुन ते दहशतवादी पाकिस्तानचेच होते हे सिद्ध होत आहे. तसेच, या दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला केला होता, हे त्यांच्या गन्समधून सोडण्यात आलेल्या गोळ्यांच्या बॅलेस्टिक परीक्षणांवरुन स्पष्ट होत असल्याने आता हा वाद उरलेलाच नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. विरोधकांनी या संबंधात राजकीय स्वार्थासाठी आणि मतपेटीच्या राजकारणासाठी भ्रम पसरविण्याचा प्रयत्न केला होता. या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे, असे प्रतिपादन भारत सरकारकडून केले गेले आहे.

कशी पटली ओळख

दहशतवाद्यांचे मतदार कार्ड क्रमांक आणि बायोमेट्रिक रेकॉर्डस् पाकिस्तानकडून प्रसारित माहितीशी ताडून पाहण्यात आले आहेत. ही माहिती एकमेकींशी पूर्णत: जुळून येत आहे. इतकेच नव्हे, तर संयुक्त राष्ट्रसंघानेही पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेनेच हे हल्ले केले आहेत, असे आपल्या अहवालात स्पष्टपणे नोंद केले आहे. त्यामुळे आता या संदर्भात कोणतीही शंका काढावयास जागा नाही. सारे काही स्वच्छपणे समोर आले आहे, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

कोण होते दहशतवादी…

जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर नजीक दाचीगाम उद्यानाच्या परिसरात 28 जुलै 2025 या दिवशी भारतीय सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. हेच अभियान ‘महादेव’ नावाने ओळखले जाते. त्यानंतर दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. त्यांची नावे, जिबरान आणि हमजा अफगाणी अशी असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्याकडून अमेरिकेच्या बनावटीची एम 4 कार्बाईन्स, ए. के. 47 रायफली, 17 अन्य रायफली आणि हातगोळे हस्तगत करण्यात आले आहेत. या सर्व शस्त्रांची आणि रायफल्सची, तसेच त्यांच्यातून सोडण्यात आलेल्या गोळ्यांचे बॅलेस्टिक परीक्षण करण्यात आले आहे. हा सर्व पुरावा अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने संकलित करण्यात आला आहे, अशी माहिती केंद्र सरकारला सादर करण्यात आलेल्या अहवालात आहे.

भाजपची विरोधकांवर टीका

विरोधकांचा भारताच्या सेनेपेक्षा पाकिस्तानवर विश्वास अधिक आहे. पाकिस्तान त्याची भाषा भारतातल्या विरोधकांकडून वदवून घेत आहे. विरोधक पाकिस्तानची री ओढण्यात मग्न आहेत. जनता हे सर्व पहात असून योग्य वेळी विरोधकांच्या पदरात त्यांचे माप पडणार आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली आहे.

भारताकडे सहा भक्कम पुरावे…

ड दहशतवाद्यांची माहिती पाकिस्तानी डाटाबेसशी पूर्णपणे मिळती जुळती

ड दहशतवाद्यांपाशी पाकिस्तानची निवडणूक ओळखपत्रे, मतदार क्रमांक

ड दहशतवाद्यांचे कॉल रेकॉर्डस् पाकिस्तानातील लोकेशनशी मिळते जुळते

ड ठार दहशतवाद्यांच्याजवळ पाकिस्तानी बनावटीच्या चॉकलेटांची रॅपर्स

ड पहलगाम हल्ल्यात चालविलेल्या गोळ्यांची कवचे या दहशतवाद्यांचीच

ड रक्ताने माखलेल्या शर्टामुळे मिळाले डीएनए, दहशतवाद्यांशी जुळणारे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.