नाशिक: आगामी कुंभमेळ्याच्या निमित्ताने महापालिकेने जवळपास ४०० कोटी रुपयांच्या जलशुद्धीकरण व जलवाहिनी टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. त्या संदर्भात निविदा प्रक्रिया राबविली. मात्र, या निविदा प्रक्रियेत अनियमितता असल्याची तक्रार शिवसेना महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी महापालिका आयुक्तांकडे करीत ही प्रक्रिया रद्द करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
जलशुद्धीकरण निविदा प्रक्रियेत डिफेक्ट लायबिलिटी नाही, दिलेल्या कालावधीत काम अपूर्ण राहिल्यास दंडाची तरतूद नाही, इलेक्ट्रिकल स्विचगिअर यंत्रणेसाठी आवश्यक भारतीय मानक कोड नाही, निविदेत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक त्रुटी, नियमभंग आणि अपारदर्शक बाबी असल्याचा दावा तिदमे यांनी तक्रारीत केला आहे. नाशिककर आणि शासनाच्या पैशांची उधळपट्टी करणारी ही निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करण्याची मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे.
निविदेत जलशुद्धीकरणासाठी कोणते तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे, याचा स्पष्ट उल्लेख नाही. सार्वजनिक आरोग्य अभियंता संस्था आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आवश्यक असलेले तांत्रिक निकषही नमूद केलेले नाहीत. निविदेतील एमएस पाइपसाठी नमूद केलेला दर हा शासनाच्या अधिकृत दर पत्रकाच्या तुलनेत अकरा हजार चारशे रुपये प्रतिमीटरने अधिक असून, त्यामुळे सुमारे वीस कोटी रुपयांचा अनावश्यक खर्च होणार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
योजना शासनमान्य असल्याचा दावा करण्यात आला असला तरी, त्यासंदर्भातील कोणतेही अधिकृत आदेश अथवा प्रशासकीय मंजुरीचे दस्तऐवज निविदेसोबत जोडलेले नाहीत. पाइपलाइन, वीज, स्वयंचलित नियंत्रण व्यवस्थेमध्ये वापरण्यात येणाऱ्या डक्टाइल आयर्न पाइप, वेरियेबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह, उच्च व निम्न दाब विद्युत पटल आणि स्विचगिअर यंत्रणेसाठी आवश्यक भारतीय मानक कोड, गुणवत्ता निकष किंवा मान्यताप्राप्त उत्पादकांची यादी दिलेली नाही. त्यामुळे गुणवत्तेची खात्री देता येत नसल्याचा आक्षेप घेतला आहे.
संपूर्ण निविदा प्रक्रियेत अनेक तांत्रिक त्रुटी ठेवल्यामुळे भविष्यात कामाच्या गुणवत्तेविषयी शंका निर्माण होत आहे. भविष्यात जनतेच्या पैसे देखभाल दुरुस्तीवरच अधिक खर्च होतील. त्यामुळे ही निविदा ठराविक, विशिष्ट ठेकेदाराला अनुकूल ठरेल, अशा प्रकारे तयार करण्यात आली असल्याचा संशय निर्माण झाल्याचा आरोप तिदमे यांनी केला.
Nashik Election : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रशासनाची तयारी सुरू; राज्य निवडणूक आयोगाचा आढावातिदमे यांचा ‘एसटीपी’लाही विरोध
शिवसेना महानगरप्रमुख तिदमे यांनी एसटीपी प्रकल्पालाही विरोध केला होता. या संदर्भात विधिमंडळात आमदार सुहास कांदे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. मात्र, त्यानंतर तिदमे व कांदे या दोघांनीही या विषयावर मौन राखले. त्यामुळे जलशुद्धीकरण प्रकल्पात खरोखर अनियमितता असेल तर हा विषय ते शेवटपर्यंत तडीस नेतील का? असा सवाल नाशिककरांमधून उपस्थित केला जात आहे.