Pune News : पुराव्याअभावी पत्नीचा दावा फेटाळला; दोन महिन्यांत पुन्हा संसार थाटण्याचा न्यायालयाचा आदेश
esakal August 08, 2025 05:45 AM

पुणे : पती शारीरिक संबंध ठेवण्यास समर्थ नाही. त्यामुळे मी त्याला सोडून माहेरी राहत आहे, असा पत्नीचा दावा कौटुंबिक न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी फेटाळला. एवढेच नव्हे तर पत्नीला दोन महिन्यांच्या आत पतीच्या घरी परत जाऊन वैवाहिक संबंध स्थापित करण्याचा आदेश दिला.

केवळ आरोप करणे आणि तो कायदेशीररीत्या सिद्ध करणे या दोन बाबी भिन्न असल्याचे स्पष्ट करत कौटुंबिक न्यायालयातील न्यायाधीश जी. ए. घुले यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात तक्रारदार महिलेचा २०२१ मध्ये एका तरुणाशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पत्नी घर सोडून गेली.

त्यामुळे पतीने हिंदू विवाह अधिनियमाच्या अंतर्गत वैवाहिक नातेसंबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी न्यायालयात दावा दाखल केला. पत्नीने कोणत्याही सबळ कारणाशिवाय आपला त्याग केला असून, तिला परत नांदायला येण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती पतीने न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात केली होती.

पतीच्या दाव्याला उत्तर देताना पत्नीने अत्यंत गंभीर आरोप केले. पती हा संशयी स्वभावाचा असून, तो शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ आहे. विवाहानंतर एकदाही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत, असेही पत्नीने लेखी जबाबात म्हटले होते. पत्नीने दुसऱ्या न्यायालयात विवाह रद्द करण्यासाठी स्वतंत्र दावा दाखल केल्याचेही तिने म्हटले होते. पत्नीने पतीच्या शारीरिक क्षमतेवर आरोप केला होता. मात्र, तिने कोणतेही वैद्यकीय पुरावे दिले नाहीत. पत्नीच्या म्हणण्यात विसंगती आहे, असे निरीक्षण न्यायाधीश जी. ए. घुले यांनी नोंदवून पत्नीचा दावा फेटाळला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.