पुणे : पुण्याहून भुवनेश्वरला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या (आयएक्स १०९८) विमानाला बुधवारी (ता. ६) बगळ्याची धडक बसली. यात विमानाच्या इंजिनचे मोठे नुकसान झाले. कंपनीच्या पथकाने इंजिन दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरीही आणखी किमान चार ते पाच दिवस या विमानाचा पुणे विमानतळाच्या ‘पार्किंग बे’ वरच मुक्काम असणार आहे. यामुळे कंपनीला लाखो रुपयांचा फटका बसणार आहे.
दरम्यान, या विमानाने १० पैकी एक ‘पार्किंग बे’ व्यापल्यामुळे पुणे विमानतळाच्या वाहतुकीवर देखील परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्राथमिक माहितीनुसार इंजिनचे सात ब्लेड निकामी झाले आहेत. त्यामुळे दुरुस्तीशिवाय विमानाचे उड्डाण अशक्य आहे. ‘ब्लेड’ची दुरुस्ती केल्यानंतरच विमानाचे उड्डाण होणार आहे.
मात्र यासाठी आणखी किमान चार दिवस लागण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे विमान कंपनीला मात्र मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. दररोज विमानतळ प्रशासनाला द्यावे लागणारे भाडे, रद्द झालेली प्रवासी सेवा, दुरुस्तीचा खर्च या सर्वांचा विचार केल्यास विमान कंपनीला मोठे आर्थिक नुकसान झाले, हे मात्र निश्चित आहे.
विमानाच्या दुरुस्तीसाठी किती दिवस लागतील, याबद्दल काही माहिती नाही. मात्र ‘पार्किंग बे’ वर विमान जास्त दिवस राहिल्याने याचा कोणताही परिणाम विमानाच्या वेळापत्रकावर होणार नाही.
- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे