लाडक्या बहिणींनो पटापट खाते चेक करा, पैसे येण्यास सुरुवात, रक्षाबंधनापूर्वी 1500 रुपये जमा
Marathi August 08, 2025 08:25 PM

मुंबई :महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालवली जाते. या योजनेतून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी दरमहा 1500 रुपयांचा निधी दिला जातो. जुलै महिन्याच्या हप्त्याची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येस पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितलं होतं त्याप्रमाणं जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

जुलै महिन्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात

जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना देण्यासाठी 2 हजार 984 कोटी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आला होता. राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसाठी एकूण 28 हजार 290 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे. योजनेच्या निकषानुसार 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात.

26 लाख लाडक्या बहिणींची गृह चौकशी सुरु

महायुती सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेतील 12 हप्त्यांची रक्कम यापूर्वी बहिणींच्या खात्यात जमा झाली होता. आता 13 व्या हप्त्याची रक्कम महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. योजनेच्या नियमानुसार एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार होता. मात्र, काही कुटुंबातील दोन पेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं त्याची पडताळणी करण्यासाठी गृहचौकशी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजनेतील लाभ घेतलेल्या तब्बल 26 लाख महिलांची गृह चौकशी होणार आहे. एका घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येत नाही. मात्र, दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेल्या तब्बल 26 लाख महिलांची यादी महिला व बालकल्याण विभागाने तयार केली आहे. या सर्व महिलांची विभागानुसार चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.

एकाच घरामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्या जास्तीच्या महिलांना मिळणारा योजनेचा लाभ बंद होणार आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ सध्या 2 कोटी 29 लाख महिलांना मिळत आहे.  त्यामुळे ही चौकशी पूर्ण झाल्यानंतर आणखी महिला लाडकी बहीण योजनेतून वगळल्या जाणार आहेत.

दरम्यान, योजनेच्या नियमानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 1500 रुपये प्रतिमहिना दिले जातात. तर, ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेता लाभ घेतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये दिले जातात.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.