लातूर : दोन महिने ज्या वीजग्राहकांचे देयक थकलेले असेल त्यांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल, असा निर्णय महावितरणने घेतला आहे. निर्णयाची जुलैपासून अंमलबजावणीही सुरू झाली आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी नियमित व दरमहा वीज देयक भरावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व वर्गवारीतील ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी प्रत्येक वर्षी वाढत आहे. यामुळे महावितरण आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता सलग दोन महिन्यांचे वीज देयक थकल्यास तिसऱ्या महिन्यात ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाणार आहे.
ही रक्कम एकदा कपात झाली की नंतर ग्राहकाला प्रथम सुरक्षा ठेवीची रक्कम व त्यानंतर देयकातील इतर शिल्लक रक्कम भरणे बंधनकारक असेल. ‘महावितरण’कडून प्रत्येक वर्षी वाढीव वीज देयकानुसार पाठवल्या जात असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम ज्या ग्राहकांनी भरली नसेल त्यांना ही संपूर्ण रक्कम भरावी लागेल.
त्यानंतरच संबंधित ग्राहकाचे शिल्लक देयक भरता येईल. ही रक्कम न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यानंतर ग्राहकाला पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी सुरक्षा ठेव, देयकाची थकबाकी भरावी लागेल. शुल्क भरूनच वीज जोडणी पूर्ववत करता येऊ शकेल, असे ‘महावितरण’च्या वतीने सांगण्यात आले.
Godavari Accident: गोदावरी नदीत पडून ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू; आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने शोधकार्यहा नियम लागू होण्यापूर्वी दोन महिन्यांचे देयक थकल्यास तिसऱ्या महिन्यात पंधरा दिवसांची नोटीस दिली जात होती. त्यानंतरही देयक न भरल्यास वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला जात होता. कायम वीजपुरवठा खंडित झाल्यावर मात्र सुरक्षा ठेवीतील रक्कम थकबाकीतून वळती केली जात होती. महावितरण सातत्याने थकीत वीजबिल भरण्याबाबत वीजग्राहकांना अवगत करत असूनही विविध कारणांमुळे बिल भरण्यास ग्राहक टाळाटाळ करतात. परिणामी, वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करावी लागत होती.