पाली : पालीतील ऐतिहासिक महत्व असलेला व अलौकिक निसर्गसौंदर्याने नटलेला सरसगड किल्ला गडप्रेमी, ट्रेकर्स व निसर्गप्रेमी यांना नेहमीच आकर्षित करतो. मात्र सरसगडावर वारंवार होणारे अपघात चिंतेचा विषय बनले आहेत. त्यामुळे प्रशासन व ट्रेकर्स कडून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणतीही खबरदारी न घेता व तयारी न करता पावसाळ्यात सरसगड या किल्ल्यावर जाणे अतिशय धोकादायक आहे. शनिवारी (ता. 2) सरसगडावरून एक तरुण पडून गंभीर जखमी झाला. रेस्क्यू टीम, पोलीस व स्थानिक यांच्या अथक परिश्रम व मेहनतीने या जखमी तरुणाला खाली आणण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. चार वर्षांपूर्वी सरसगडावरून पडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता. पावसाळ्यात सरसगड किल्ल्यावरून आतापर्यंत अनेक ट्रेकर्स व दुर्गप्रेमी पडल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे या घटना टाळण्यासाठी प्रशासन तसेच स्थानिक आणि प्रशिक्षित ट्रेकर्स यांनी सरसगडावर जाताना प्रत्येकाने योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. अनेक पर्यटक व दुर्गप्रेमी पावसाळ्यात कोणतीही खबरदारी न घेता व आवश्यक संसाधने न वापरता सरसगडावर ट्रेकिंग साठी जातात. आणि मग त्यांना दुर्घटनेला सामोरे जावे लागते.
सरसगड किल्ल्यावर येणाऱ्यांनी आवश्यक सेफ्टी निकषांचे तंतोतंत पालन करावे. किल्ल्यावर कोणत्याही दुर्गम व धोकादायक ठिकाणी जाऊ नये. तसेच किल्ल्यावर चढताना व उतरताना आवश्यक खबरदारी घ्यावी आणि शक्यतो पावसाळ्यात येणे टाळावे.
हेमलता शेरेकर, पोलीस निरीक्षक, पाली
नगरपंचायत मार्फत सरसगड किल्ल्याच्या पायथ्याशी ताबडतोब आवश्यक सूचनाफलक लावण्यात आले आहेत. पावसाळ्यात किल्ल्याचा मार्ग अत्यंत धोकादायक झाल्याने पर्यटक व दुर्गप्रेमींनी सरसगड किल्ल्यावर जाण्याचे टाळावे.
माधुरी मडके, मुख्याधिकारी, पाली नगरपंचायत
पावसाळ्यात धोकादायक
सरसगड किल्ला पावसाळ्यात निसरडा होतो. सरसगड किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या पायऱ्या या पावसाळ्यामध्ये चिकट होतात. त्यावर शेवाळ देखील चढते त्यामुळे तेथून चढताना व उतरताना अनेक वेळा पाय घसरतो. याशिवाय सरसगडावर चढताना तीव्र उतार आहे. पावसाळ्यात तिथे गवत येते तसेच तेथील जागा चिकट होते त्यामुळे. तेथे देखील पाय घसरण्याचा व तोल जाण्याचा धोका आहे. किल्ल्याच्या वरच्या टप्प्यावर देखील चढताना असलेल्या छोट्या पायऱ्या चिकट होतात आणि तेथून जाताना वाट धोकादायक होते.
छत्रपती शिवरायांनी दुरुस्तीसाठी दिले दोन हजार होन
छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचे महत्व ओळखून गडास स्वराज्यात दाखल करुन घेतले. सरसगडाच्या दुरुस्तीसाठी दोन हजार होन मंजुर केले. या नुसार दुर्गमता व विपूल जलसंचय यावर विशेष भर देवून गडाची बांधणी करण्यात आली. दुरवर टेहाळणी करण्यास व इशारा देण्यास "सरस" म्हणून किल्ल्यास सरसगड नाव देण्यात आले.
असा आहे सरसगड किल्लाअग्निजन्य खडकापासून बनलेल्या या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासुन 490 मिटर आहे. किल्याच्या दक्षिण बाजुकडील 111 पायर्या सलग एकाच दगडात घडविलेल्या असुन उंच व प्रशस्त आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी दक्षिण व उत्तर दोन्ही बाजूकडून वाटा आहेत. चुना व घडीव दगडांचा उपयोग करून किल्ल्याला बुरुज व तटबंदी करण्यात आली आहे. या दोन्ही बाजुला किल्ल्यावर येण्यासाठी प्रवेशद्वार कोरलेले आहेत. दक्षिणेकडील दरवाजा "दिंडी दरवाजा" म्हणुन ओळखला जातो. उत्तरेकडुन किल्ला चढून गेल्यावर प्रवेशद्वाराजवळ मोती हौद आहे. या हौदातील पाणी अतिशय थंड व स्वच्छ असून ते बारामही उपलब्ध असते. या हौदाची खोली तीन मिटर आहे.
अशा प्रकारचे दहा मोठ हौद बालेकिल्ल्याच्या पायथ्याशी खोदलेले आहेत. किल्ल्यावर घोड्याची पागा, धान्य कोठारे, शस्त्रागारे, कैदखाने, दारूगोळा कोठारे व देवळ्या खोदून बांधण्यात आली आहेत. बैठकीच्या खोल्या बांधण्यात आल्या असून यामध्ये शिबंदी राहत असे. तोफा व बंदूकांचा वापर करण्यासाठी बुरुज व तटास अनेक छिद्रे (जंग्या) ठेवण्यात आली आहेत. किल्ल्याला दक्षिणोत्तर जाणारे भुयार बालेकिल्ल्याच्या खालील बाजूस खोदलेले आहे. बालेकिल्ल्यावर जागेचे क्षेत्रफळ अर्धा हेक्टर आहे. या जागेत जोगेश्वरी (केदारेश्वर) मंदिर व त्याभोवती तळे आहे. तसेच शहापिर दर्गा आहे. वैशाख पौर्णिमेला दर्ग्याचा उरुस भरतो तर श्रावणी सोमवार व महाशिवरात्रीला केदारेश्वराच्या दर्शनासाठी किल्ल्यावर भाविकांची गर्दी असते.