रक्षाबंधन : एक धागा मनाचा
esakal August 09, 2025 12:45 PM

- शलाका तांबे, लेखिका, लाइफ कोच, समुपदेशक

आज रक्षाबंधन आहे. बहीण-भावाचे नाते साजरे करणारा सण म्हणजे रक्षाबंधन, राखीपौर्णिमा. लहानपणी राखी म्हणजे घरी आईने केलेले श्रीखंड, बहिणीने सजवलेले तबक, तिने केलेले औक्षण, आणि त्यानंतर मिळालेले छोटेसे गिफ्ट... अशा आपल्यापैकी बहुतेक जणांच्या त्या दिवशीच्या आठवणी असतील.

आता तेच बहीण-भाऊ मोठे झाले, आपल्या स्वतंत्र करिअर, जीवनामध्ये व्यग्र झाले. बहीण पुण्यात, तर भाऊ बंगळूरमध्ये, प्रत्येक राखीपौर्णिमेला भेट होईलच असेही नाही. मग व्हिडिओ कॉलवरून औक्षण करून एकमेकांना ऑनलाइन गिफ्ट्स पाठवून आपण आजच्या बदलत्या जीवनशैलीप्रमाणे; पण आनंदाने हा सण साजरा करतो.

मात्र, या सगळ्या धामधुमीत आपण कधी हा विचार करतो का, की या सणाच्या मूलभूत ‘संस्काराचे’, त्यामागच्या मूलभूत ‘विचाराचे’ स्वरूप आपण जपतो आहे का? किंवा व्हायचे स्वरूप कसे बदलले पाहिजे, याचा विचार आपण करतो आहे का?

राखी म्हणजे फक्त एक दोरा नाही. तो विश्वासाचा, आपुलकीचा, आणि काळजीचा धागा आहे. जसा काळ बदलतो, तसे नात्याचे स्वरूपही बदलते आणि त्याचप्रमाणे प्रत्येक सणाचा अर्थ, त्याचे स्वरूपही बदलत असते. आपण त्या बदलाला समजून घेऊन त्याला नवीन अर्थ देणे अपेक्षित असते.

बदलती जीवनशैली;

बदलती राखी

आजची धकाधकीच्या जीवनशैली, आणि व्यस्त दिनक्रम, आणि भावनिक संवादाची कमतरता ही आजच्या जीवनशैलीची काही कटू सत्ये आहेत. आज भाऊ आणि बहीण दोघांनी एकमेकांना या कटू सत्यांपासून संरक्षण देणे गरजेचे आहे. म्हणून आजच्या बदललेल्या जीवनशैलीला अनुरूप असा ‘रक्षाबंधन’ या शब्दाचा अर्थविस्तार आपण करायला हवा. ‘राखी’ म्हणजे ‘संरक्षण’; पण मग संरक्षण नक्की कशापासून? किंवा नेमके कुठल्या गोष्टींचे ‘रक्षण’ केले पाहिजे, याबद्दल जागरूक व्हायला हवे.

रक्षण म्हणजे फक्त शारीरिक संरक्षण नाही. आज रक्षणाचा अर्थ फक्त ‘संरक्षण’ नसून, एकमेकांच्या स्वातंत्र्याचा सन्मान, एकमेकांच्या स्वप्नांना, निवडींना, विचारांना आधार देणे, असा असायला हवा. हेच आजच्या काळातले खरे रक्षण म्हणता येईल.

आज बहीण-भाऊ दोघांनीही एकमेकांच्या भावनांचे रक्षण करणे, त्यांचा सन्मान करणे हेही खूप महत्त्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या आणि व्यस्त जीवनशाईनमुळे आपल्या भावंडांबरोबर ‘deep connection’ बनवण्यासाठी आपण एकमेकांना पाहिजे तितका वेळ देऊ शकत नाही.

पण आपल्या संस्कृतीची ही ताकद आहे, की आपल्या प्रत्येक नात्याला वर्षभरातून एका दिवसाची पूर्ण जागा मिळेल, असे प्रयोजन केलेले आहे. मग आपण राखीच्या दिवशी एकेमकांबरोबर खराखुरा संवाद साधू शकतो का? हा पैलू आपण आपल्या सणामध्ये कसा आणू शकतो, हे बहीण-भावंडांनी एकमेकांबरोबर बसून ठरवले, तर या सणाची आणि नात्याची संकल्पना अजून फुलेल.

राखीच्या धाग्याबरोबर, मनाचे धागे कसे घट्ट करता येतील याचाही विचार आज प्रत्येक बहीण-भावाने करणे आवश्यक आहे. एकमेकांसाठी एक safe space आपण कशी तयार करू शकतो याचाही विचार आपण केला पाहिजे.

‘माइंडफुल’ राखी

भौगोलिक अंतरामुळे भेटणे शक्य नसेल, तरी रोजच्या धावपळीतून थोडे थांबून आपल्या भावंडांबरोबर एक माइंडफुल संवाद साधण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी नक्की करावा. यालाच ‘माइंडफुल’ राखी म्हणता येईल. मग तो दिवस कोणताही असू शकेल. अगदी त्या दिवशी जमले नाही तरी, एक दिवस ठरवून आपण mindful conversation नक्कीच करायला हवे.

राखीचा धागा आता केवळ हातावर नसून, मनावर गुंफण्याची वेळ आली आहे. रक्षाबंधनाचा अर्थ म्हणजे केवळ ‘मी तुझं रक्षण करीन’ असे न म्हणता, ‘मी तुझ्या आयुष्याला समजून घेईन’ असे सांगण्याची सजग संधी, असा अर्थविस्तार आपण करू शकतो आणि या सुंदर सणाला केवळ टिकवायचे नव्हे, तर जाणून साजरे करायचे आहे, असाही संकल्प आपण घेऊ शकतो.

म्हणून ‘मानसभान’ ठेवून आजपासून आपण एकमेकांचे रक्षण करूया - फक्त बाहेरचे नव्हे, तर आतले. तणाव, गोंधळ, गोंगाट यांच्या काळात एकमेकांच्या शांततेचे, स्वीकाराचे, स्वप्नांचे, निवडींचे, विचारांचे आणि आपल्या नात्याचे खरे रक्षण आपण करूयात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.