- मुग्धा कऱ्हाडे आणि आनंद मुरुगकर
मनोरंजनसृष्टीतल्या ग्लॅमर, गजबज आणि सततच्या व्यस्त दिनचर्येत काही नाती अगदी हळूहळू; पण घट्ट तयार होतात. अशाच एका सुंदर मैत्रीची गोष्ट आहे गायिका मुग्धा कऱ्हाडे आणि निर्माते आणि मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत असणारे आनंद मुरुगकर यांची. जिथे पहिल्या ओळखीपासून ते आजपर्यंतच्या प्रवासात हसरे किस्से, सामायिक आवडी आणि एकमेकांच्या स्वभावगुणांची मनापासून केलेली प्रशंसा दिसते.
या मैत्रीविषयी मुग्धा सांगते, ‘अनेक चित्रपटांच्या प्रीमियरला किंवा गाण्यांच्या लॉन्चला आनंदला पाहिलं होतं, त्यामुळे आम्ही एकमेकांना ओळखत होतो; पण खरी मैत्री सुरू झाली ती माझे मित्र स्वप्नील आणि प्रफुल्ल यांच्या स्टुडिओत. मी तिथे स्केचेस रेकॉर्ड करायला जायचे आणि आनंदचं ऑफिस अगदी बाजूलाच होतं. ब्रेकच्या वेळेस किंवा संध्याकाळी नाश्त्यासाठी बाहेर पडताना आमचं बोलणं सुरू झालं आणि हळूहळू मैत्री घट्ट झाली.’
ती पुढे हसत म्हणते, ‘मी नेहमीच थोडी घाबरणारी, पॅनिक होणारी आणि टेन्शन घेणारी; पण आनंद अगदी याच्या उलट. शांत, संयमी आणि सिच्युएशन हाताळणारा. त्याच्यातला हा गुण मला नेहमीच आवडला. मी गायक असूनही स्टेजखाली लोकांशी बोलायला थोडं कचरते; पण आनंद कोणाशीही सहज गप्पा मारतो. अगदी आमच्या बिल्डिंगमध्येही माझ्यापेक्षा आनंदच जास्त फेमस आहे.’
आनंद सांगतो, ‘आमची ओळख साधारण ‘एक तारा’ या चित्रपटापासून सुरू झाली; पण खऱ्या गप्पा रंगल्या त्या एका चित्रपटाच्या प्रीमिअरच्या वेळी. कामाव्यतिरिक्त आयुष्याविषयी बोलताना जाणवलं, की ही व्यक्ती माझी खूप चांगली मैत्रीण होऊ शकते. मैत्री होण्यासाठी समोरचं माणूस आपल्याला जाणून घ्यावंसं वाटायला हवं, आणि मुग्धाबाबत असंच घडलं.’
तो पुढे म्हणतो, ‘मुग्धाचं व्यक्तिमत्त्व खूप सॉर्टेड आहे. तिला काय हवंय, ते अगदी स्पष्ट माहिती असतं. तिचा वक्तशीरपणा, कामाची पद्धतशीर मांडणी, आणि कोणतीही टास्क उत्तमरीत्या पूर्ण करण्याची तिची सवय वाखाणण्याजोगी आहे. स्वतःवर आणि इतरांवर प्रेम करणं, प्राणिमात्रांवर माया करणं, छोट्या गोष्टी काटेकोरपणे प्लॅन करणं या सगळ्या गोष्टी तिच्याकडून शिकण्यासारख्या आहेत.’
आनंद यांनी एक छोटासा किस्सा शेअर केला, ‘एकदा आम्ही बिल्डिंगमधील एक कुत्रा ॲडॉप्ट करायचं ठरवलं; पण त्याच्या तब्येतीत काही दोष असल्यामुळे एका दिवसातच तो परत द्यावा लागला. फक्त त्या एका दिवसातच मुग्धाचा त्याच्यावर एवढा जीव जडला होता, की पुढचे तीन दिवस ती त्याच्या आठवणीत होती. प्राण्यांविषयी तिचं प्रेम शब्दांत सांगता येणार नाही.’
मुग्धा सांगत होती, ‘माझ्या वाढदिवसाला आनंद आणि आई-बाबांनी मिळून मला ‘कुल्फी’ ही श्वान गिफ्ट केली. तो क्षण माझ्यासाठी आजही बेस्ट मेमरी आहे.’
मैत्रीची व्याख्या करत मुग्धा म्हणली, ‘ज्याच्या समोर मला कधी प्रेटेंड करावं लागणार नाही, मी जशी आहे तशी राहू शकेन, चुका केल्या तरी निर्भीडपणे सांगणारा आणि समजून घेणारा, तोच माझा खरा मित्र.’
आनंद म्हणतो, ‘मैत्री ही निखळ असते, कुठल्याही बंधनांच्या पलीकडचं नातं. त्यात अपेक्षा किंवा गर्वाला जागा नसावी. भांडणं, मतभेद होऊ शकतात; पण त्यातून नातं बिघडता कामा नये. जर ते सहज सोडून देता येत असेल, तरच ते खरं मैत्रीचं नातं आहे.’
(शब्दांकन : महिक्षा)