देशात गेल्या काही वर्षात इंधनाची मागणी झपाट्याने वाढली आहे. इंधनाची गरज पाहता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिलं जात आहे. मात्र असं असूनही इंधनावरची अवलंबता अजून काही कमी झाली नाही. त्यामुळे पेट्रोल, डिझेलसोबत इथेनॉल निर्मितीवर भर दिला जात आहे. ऊस आणि मक्यापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉलची निर्मिती केली जात आहे. असं असताना यात आता बांबूची भर पडणार आहे. यासाठी अरूणाचल प्रदेशमध्ये पहिला खासगी प्लांट टाकला जाणार आहे. अरुणाचल प्रदेशचे मंत्री ओजिंग तासिंग म्हणाले की, राज्य सरकार अक्षय ऊर्जा म्हणून बांबूचा वापर करून देशातील पहिला खाजगी 2G इथेनॉल प्लांट सुरू करण्याची योजना आखत आहे. स्वच्छ उर्जेमध्ये राज्याला पुढे नेण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहे. तासिंग यांनी या उपक्रमाचे वर्णन राज्याच्या हिरवळीच्या भविष्यासाठी एक ऐतिहासिक व्यासपीठ म्हणून केले. बांबूचा वापर हा राज्याच्या विपुल नैसर्गिक संसाधनांप्रती असलेल्या वचनबद्धतेशी परिपूर्ण सुसंगत आहे असे ते म्हणाले.
अरुणाचल प्रदेश शाश्वत जैव-औद्योगिक विकासात अग्रणी’ या विषयावरील परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहिल्यानंतर राज्याचे ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री तासिंग यांनी सोशल मीडियावर ही घोषणा केली. वाहनांसाठी पर्यायी इंधन म्हणून इथेनॉलचा वापर केला जातो. इंधनाची आयात कमी करण्यासाठी हा पर्यात उत्तम आहे. सध्या ऊस आणि मका या सारख्या पिकांमधून इथोनॉलची निर्मिती केली जाते. त्यानंतर ते पेट्रोलमध्ये मिसळून वापरलं जातं. या माध्यमातून पेट्रोलचा वापर आणि प्रदूषण कमी करण्याचा हेतू आहे. “हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ तांत्रिक प्रगतीपेक्षा जास्त आहे. तो भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणाचे नेतृत्व करण्याच्या अरुणाचल प्रदेशच्या संकल्पाचे प्रतीक आहे,”, असं तासिंग म्हणाले.
पेट्रोलमध्ये एका ठरावीक प्रमाणात इथेनॉलचं मिश्रण केलं जातं. म्हणजेच आता तुम्ही बाजारातून घेत असलेल्या इंधनात 20 टक्के इथेनॉल मिसळलेले असेत. बाजारात ई20 इंधन असून नवीन वाहनांवरही ई20 लिहिलेले असते. पेट्रोल आणि इथेनॉल इंजिनमध्ये जळते आणि त्यातून ऊर्जा निर्माण होते. इथेनॉल पूर्णपणे नैसर्गिक असल्याने त्यातून कमी प्रदूषण होते. तसेच इंधनाची आयातही कमी होते.